चिनी सुंदरीनं २२ वर्षं मेकअपच उतरवला नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 07:24 IST2025-07-17T07:24:24+5:302025-07-17T07:24:33+5:30
चीनची ३७ वर्षीय एक इन्फ्लुएन्सर. चीनमध्ये ती बरीच लोकप्रिय आहे आणि सोशल मीडियावरही तिचे चांगलेच फॉलोअर्स आहेत. ‘नियोमियान’ या ...

चिनी सुंदरीनं २२ वर्षं मेकअपच उतरवला नाही
चीनची ३७ वर्षीय एक इन्फ्लुएन्सर. चीनमध्ये ती बरीच लोकप्रिय आहे आणि सोशल मीडियावरही तिचे चांगलेच फॉलोअर्स आहेत. ‘नियोमियान’ या नावाने ती तिथे ओळखली जाते. तिची एक वेगळीच कहाणी सध्या जगभर व्हायरल होते आहे. त्यावरून हसावं की रडावं, हेच लोकांना कळत नाही. आपण कायम चांगलं दिसावं, प्रेझेन्टेबल असावं याची आवड अनेकांना असते. नियोमियान तर इन्फ्लुएन्सर. आपला चेहरा लोकांच्या कायम लक्षात राहावा आणि आपण सुंदर दिसावं यासाठी तिनं काय करावं?
गेल्या २२ वर्षांत तिनं आपल्या चेहऱ्याचा मेकअपच उतरवला नाही! त्याचे परिणाम आता तिला भोगावे लागत आहेत. आपली ही आपबीती तिनं स्वत:च शेअर केली आहे, आपले आता कसे ‘भूत’ झाले आहे, हे दर्शवणारा त्यासंदर्भातला स्वत:चा व्हिडीओही तिनं शेअर केला आहे आणि माझ्यासारखा मूर्खपणा कुणी चुकूनही करू नये, असं कळकळीचं आवाहनही तिनं केलं आहे. तिच्या चेहऱ्याचे आता कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे.
तिनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिचा चेहरा पूर्णपणे लाल झालेला, सुजलेला, त्यावर पुरळ आलेले दिसताहेत. तिच्या चेहऱ्याला सारखी खाजही येत असते. चेहऱ्याच्या त्वचेची आग होत असते. ‘हार्मोनल फेस’च्या समस्येनं ती बेजार झालेली आहे.
नियोमियानचं म्हणणं आहे, वयाच्या १४ व्या वर्षी चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्ससाठी पहिल्यांदा तिनं क्रीम लावायला सुरुवात केली. त्यानंतर तिला ॲलर्जीची सुरुवात झाली. वयाच्या १५ व्या वर्षापासून तिनं चेहऱ्यावर मेकअप करायला सुरुवात केली; पण तब्बल २२ वर्षे तिनं तो मेकअप नीट उतरवलाच नाही. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं कायम स्वस्त फाउंडेशनचा वापर केला, असंही तिचं म्हणणं. त्यामुळे तिच्या त्वचेची आणखीच वाट लागली.
ब्यूटी आणि हेअरड्रेसिंगचा कोर्स करताना तर तिनं आपल्या चेहऱ्यावर अनेक प्रकारचे मेकअप थापले. विविध केमिकल्सचा वापर केला. २०११ मध्ये तिने वेगवेगळ्या प्रकारच्या कॉस्मेटिक्सचा उपयोग केला, इंजेक्शन्स घेतली. त्यामुळे आधीच खराब झालेला तिचा चेहरा ‘विकृत’ व्हायला लागला.
व्हिडीओमध्ये आपली चूक कबूल करताना नियोमियान म्हणते, मी कधीच, कोणत्याच गोष्टीसाठी धीर धरू शकले नाही. कोणतंही उत्पादन मी दोन दिवसांपेक्षा जास्त काळ वापरलं नाही. माझ्या चेहऱ्यावर मी कायम प्रयोग करीत राहिले.
या सवयीमुळे तिचा चेहरा दिवसेंदिवस अधिकाधिक लाल होत गेला. चेहऱ्याच्या त्वचेवर परजीवी जंतू वाढले. थोड्याच कालावधीत तर स्थिती अशी झाली, की तिला आपल्या चेहऱ्यावर हजारो मुंग्या चालताहेत असा भास होऊ लागला.
नियोमियान आता सगळ्यांना सांगते, ‘इन्स्टंट इफेक्ट’ देणारं कोणतेही उत्पादन वापरू नका. ते वापरताना हजार वेळा विचार करा. कारण दीर्घकाळात बऱ्याचदा ते तुमच्या त्वचेचं नुकसानच करतं. शरीराला नैसर्गिकरीत्या बरं होऊ द्या. त्यातच तुमचं भलं आहे. तिला आता आपला स्वत:चा चेहरा लोकांना दाखवायलाही लाज वाटते आहे. त्यामुळे तिनं स्वत:ला घरातच कोंडून घेतलं आहे. ज्या चेहऱ्याचा एकेकाळी तिला खूप अभिमान होता, तोच चेहरा आता ती जगापासून लपवते आहे.