मसुद अजहरला संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादी यादीत टाकण्यास चीनचा विरोध
By Admin | Updated: April 2, 2016 17:49 IST2016-04-02T17:49:34+5:302016-04-02T17:49:34+5:30
पठाणकोटमध्ये दहशतवादी हल्ला करणा-या जैश-ए-मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसुद अजहरला संयुक्त राष्ट्र संघ समितीच्या दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यास चीनने विरोध केला आहे

मसुद अजहरला संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादी यादीत टाकण्यास चीनचा विरोध
>ऑनलाइन लोकमत -
वॉशिंग्टन, दि. २ - पठाणकोटमध्ये दहशतवादी हल्ला करणा-या जैश-ए-मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसुद अजहरला संयुक्त राष्ट्र संघ समितीच्या दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यास चीनने विरोध केला आहे. चीन केलेल्या या विरोधावर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चीनने केलेला विरोध हा फक्त तांत्रिक आधारावर घेतला गेला असून अनाकलनीय असल्याची टीका भारताने केली आहे.
दहशतवादाचा सामना करण्यासाठी निवडक दृष्टीकोन ठेवला गेला असल्याचा आरोप भारताने केला आहे. चीनने प्रतिबंध करण्याचा (व्हेटो) अधिकार वापरत हा विरोध केला आहे. संयुक्त राष्ट्र समितीच्या पाच सदस्यांकडे (व्हेटो) प्रतिबंध करण्याचा अधिकार आहे. यामध्ये चीनचादेखील समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत पाच कायम सभासद राष्ट्रे (अमेरिकेची संयुक्त संस्थाने, रशिया, चीन, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स) आहेत. त्या प्रत्येकास हा खास अधिकार या संघटनेच्या सनदेने दिलेला आहे.
संयुक्त राष्ट्र समितीच्या सदस्यांमध्ये पाकिस्तान नसतानादेखील चीनने त्यांच्याशी चर्चा करुन हा विरोध केल्याची माहिती सरकारी सुत्रांकडून मिळाली आहे. मसुद अजहरला दहशतवाद्यांच्या यादीत न टाकल्याने भारताला अजूनही पठाणकोटसारख्या दहशतवादी हल्ल्यांना सामोरे जावं लागत असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने वॉशिंग्टनमध्ये करण्यात आलेल्या निवेदनात सांगितलं होतं.
पठाणकोट दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसुद अजहरचं नाव दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघ समितीला पत्र पाठवलं होतं. भारताने संयुक्त राष्ट्र संघ समिती 1267कडे पत्राद्वारे औपचारिक विनंती केली होती. जैश-ए-मोहम्मदचं नाव दहशतवादी संघटनांच्या यादीत आहे मात्र त्याच्या प्रमुखाचं नाही ही विसंगती असल्याचंही परराष्ट्र मंत्रालयाने लिहिलं होतं. भारताने यावेळी ठोस पुरावेदेखील सादर केले होते. मात्र चीनने हे प्रकरण स्थगित ठेवण्याची विनंती केली आहे.