दक्षिण चिनी समुद्रात चीनचं शक्तिप्रदर्शन, पाण्यात उतरवली विमानवाहू युद्धनौका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 20:56 IST2018-03-30T20:56:54+5:302018-03-30T20:56:54+5:30
दक्षिण चिनी समुद्रात स्वतः दबदबा कायम ठेवण्यासाठी चीननं स्वतःजवळ असलेली शक्तिशाली विमानवाहू युद्धनौका समुद्रात उतरवली आहे.

दक्षिण चिनी समुद्रात चीनचं शक्तिप्रदर्शन, पाण्यात उतरवली विमानवाहू युद्धनौका
बीजिंग- दक्षिण चिनी समुद्रात स्वतः दबदबा कायम ठेवण्यासाठी चीननं स्वतःजवळ असलेली शक्तिशाली विमानवाहू युद्धनौका समुद्रात उतरवली आहे. इतर डझनांहून अधिक युद्धनौकांबरोबरच ही विमानवाहू युद्धनौका समुद्रात उतरवल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एवढी शक्तिशाली विमानवाहून युद्धनौका समुद्रात उतरवून चीननं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे.
सॅटेलाइटवरील छायाचित्रांवरून ही विमानवाहू युद्धनौका समुद्रात उतरवल्याचं उघड झालं आहे. परंतु ही युद्धनौका युद्धसरावासाठी समुद्रात उतरवल्याचं चीनकडून स्पष्टीकरण दिलं गेलं आहे. दक्षिण चीन समुद्रातील हेनन प्रांतात ही विमानवाहू युद्धनौका इतर 40 युद्धनौकांमध्ये उभी असलेलं पाहायला मिळत आहे. चीननं लियाओनिंग या त्यांच्या समुद्री भागात ही युद्धनौका तैनात केल्याचंही सेटलाइटच्या माध्यमातून मिळालेल्या छायाचित्रांत दिसत आहे.
या युद्धसरावात चीनकडून 6 पाणबुड्या आणि दोन 2 जे-15 लढाऊ विमानंही सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीनं स्टेटस सिम्बॉलसाठीही ही विमानवाहू युद्धनौका समुद्रात उतरवल्याचं सिंगापूरचे सैन्य विश्लेषक जेम्स चाड यांचं म्हणणं आहेत. दक्षिण चिनी समुद्राच्या दाव्यावरून चीनचा अनेकदा शेजारील राष्ट्रांशी वाद उद्भवला आहे. दक्षिण चीन सागरासंबंधी आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय मान्य करायला चीन तयार नसून संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर चीन आजही आपला हक्क सांगत आहे. या समुद्रातील नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे चीनला या भागात जास्त रस आहे. इथे चीनने अनेक कृत्रिम बेटे उभारली आहेत. त्यामुळे व्हिएतनामच्या राष्ट्रीय हिताला धोका निर्माण झाला आहे. चीन एक प्रकारे पश्चिम पॅसिफिक सागरातील अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देत आहे. त्यामुळे अमेरिकेने या भागातील सक्रियता वाढवली आहे. अमेरिकेच्या युद्धनौकेची व्हिएतनाम भेट ही या दोन देशातील वैरत्वाची भावना संपुष्टात आल्याचे लक्षण आहे. चीनचा धोका ओळखून दोन्ही देशांनी संरक्षण संबंध दृढ करण्यावर भर दिला आहे.