चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 18:46 IST2025-10-17T18:45:35+5:302025-10-17T18:46:21+5:30
xi jinping he weidong china politics: चिनी लष्करातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च लष्करी नेते हे वेइडोंग यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले आहे

चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
xi jinping he weidong china politics: चीनमध्येशी जिनपिंग यांच्या उत्तराधिकाऱ्यांबाबत चर्चा आणि वादविवाद सुरू असतानाच एक मोठी घटना घडली आहे. चिनी लष्करातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च लष्करी नेते हे वेइडोंग यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले आहे. ते चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोचे सदस्य देखील होते. त्यांना पॉलिटब्युरोमधूनही काढून टाकण्यात आले आहे. गंभीर भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे वेइडोंग यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
वेइडोंग यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या महिन्याच्या अखेरीस चीन सरकार आणि पक्षाची एक महत्त्वाची वार्षिक बैठक होणार आहे. त्याच्या काही दिवस आधीच त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, वेइडोंग यांच्याव्यतिरिक्त भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून इतर सात लष्करी जनरलना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये मियाओ हुआ, केंद्रीय लष्करी आयोगाचे सदस्य हे होंगजुन आणि सीएमसी जॉइंट ऑपरेशन्स कमांड सेंटरचे वांग शिउबिन यांचाही समावेश आहे.
कोण आहेत वेइडोंग?
हे वेइडोंग यांचा जन्म १९५७ मध्ये चीनमधील फुजियान येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या गावातील शाळेत झाले होते. त्यानंतर त्यांनी चिनी सैन्याच्या नानजिंग मिलिटरी स्कूलमध्ये पदवीचे शिक्षण घेतले. पुढे ते चिनी सैन्यात सामील झाले. २०१२मध्ये शी जिनपिंग सत्तेवर आल्यानंतर वेइडोंग यांची प्रतिष्ठा वाढू लागली. २०१३मध्ये त्यांना पहिल्या जिआंग्सू मिलिटरी डिस्ट्रिक्टचे कमांडर म्हणून नियुक्त करण्यात आले.
२०१८मध्ये केंद्रीय स्तरावर पोस्टिंग
मार्च २०१४ मध्ये वेइडोंग यांना शांघाय गॅरिसन कमांडचे कमांडर म्हणून नियुक्त करण्यात आले. २०१६ मध्ये, वेइडोंग यांच्या कामगिरीची दखल घेऊन शी जिनपिंग यांच्या सरकारने त्यांना वेस्टर्न थिएटर कमांड ग्राउंड फोर्सचे कमांडर म्हणून नियुक्त केले. तर २०१८ मध्ये त्यांना केंद्रीय स्तरावर पोस्टिंग मिळाले. त्याच वर्षी त्यांना ईस्टर्न कमांडची पोस्टदेखील देण्यात आली.
दुसऱ्या क्रमांकाची पोस्ट
२०२२ मध्ये, वेइडोंग यांची केंद्रीय लष्करी आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. याचे अध्यक्ष चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आहेत. चीनच्या लष्करात उपाध्यक्ष हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. राष्ट्राध्यक्षांनंतर, वेइडोंग हे लष्करातील सर्वात प्रभावशाली सदस्य होते. त्यांना पक्षाच्या पॉलिटब्युरोमध्येही नियुक्त करण्यात आले होते. दोन वर्षे दोघांमधील संबंध चांगले होते, पण २०२४मध्ये संबंध बिघडले आणि वेइडोंग बेपत्ता झाले.
एक वेळ अशी होती की, त्यांना चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे उत्तराधिकारी मानले जात होते. आता चीन सरकारने अधिकृतपणे वेइडोंग यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.