ड्रॅगनचा डाव! २०३२ पर्यंत अंतराळातील 'सुपर पावर' होणार चीन, रिपोर्टमधून दावा; अमेरिकेचं टेन्शन वाढलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 12:14 IST2022-08-27T12:13:39+5:302022-08-27T12:14:43+5:30
अंतराळातील सुपर पावर बनण्यासाठी चीननं आता कंबर कसली आहे.

ड्रॅगनचा डाव! २०३२ पर्यंत अंतराळातील 'सुपर पावर' होणार चीन, रिपोर्टमधून दावा; अमेरिकेचं टेन्शन वाढलं
बिजिंग-
अंतराळातील सुपर पावर बनण्यासाठी चीननं आता कंबर कसली आहे. अमेरिकेच्या तुलनेत प्रत्येक गोष्टी पुढे जाण्याचा चंग चीननं बांधला आहे. विशेषत: स्पेस सेक्टरमध्ये चीननं जोर लावला आहे. यासंदर्भात आलेल्या एका रिपोर्टमध्ये चीनच्या भूमिकेमुळे जगाचं टेन्शन वाढलं असल्याचं नमूद केलं आहे. चीनला रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना न केल्यास 2032 पर्यंत ड्रॅगन अंतराळातील महासत्ता बनेल, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. अमेरिकन सरकारच्या या अहवालानुसार चीन अंतराळात शक्तिशाली बनण्यासाठी आर्थिक, राजनैतिक आणि लष्करी दृष्ट्या काम करत आहे असं नमूद करण्यात आलं आहे.
यूएस स्पेस फोर्स, डिफेन्स इनोव्हेशन युनिट, एअर फोर्स विभाग आणि एअर फोर्स रिसर्च लॅबोरेटरीच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील अहवाल लिहिला आहे. 2022 च्या 'स्टेट ऑफ द स्पेस इंडस्ट्रियल बेस' अहवालाने सुचवलं आहे की अमेरिकेनं चीनवर आपली आघाडी निर्माण करण्यासाठी वेगानं कृती करणं आवश्यक आहे. यामध्ये अधिक व्यावसायिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि दीर्घकालीन धोरण यांचा समावेश आहे. अंतराळात चीनच्या वाढत्या सामर्थ्यामुळे अमेरिका चिंताग्रस्त आहे. अहवालानुसार, 2032 पर्यंत चीन अंतराळातील महासत्ता बनेल.
अंतराळातील चीनची ताकद वाढणार
आता अमेरिकेला चीनची वाढती पावलं कोणत्याही किंमतीत थांबवावी लागतील, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. हा अहवाल यूएस स्पेस फोर्स, डिफेन्स इनोव्हेशन युनिट आणि एअर फोर्सच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे तयार केला आहे. अहवालानुसार, अंतराळात शक्ती वाढवण्यासाठी चीन आर्थिक, राजनैतिक आणि लष्करी दृष्ट्या काम करत आहे.