G7: आता लहान समूह जगावर राज्य करू शकत नाहीत; चीनने दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 16:38 IST2021-06-13T16:35:50+5:302021-06-13T16:38:40+5:30
G7: देशांच्या बैठकीवर चीनने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, आता लहान समूह जगावर राज्य करू शकत नाहीत, असा इशारा चीनकडून देण्यात आला आहे.

G7: आता लहान समूह जगावर राज्य करू शकत नाहीत; चीनने दिला इशारा
बिजिंग: इंग्लंडमधील कार्बिस येथे जी-७ समूह देशांच्या एका शिखर परिषदेला सुरुवात झाली आहे. या देशांच्या बैठकीवर चीनने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, आता लहान समूह जगावर राज्य करू शकत नाहीत, असा इशारा चीनकडून देण्यात आला आहे. लंडन येथे असलेल्या चीन दूतावासातील एका प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली आहे. (china says that g7 small groups do not rule the world)
एक काळ असा होता, जेव्हा जागतिक स्तरावरील छोटे समूह वैश्विक निर्णय घेत होते. मात्र, आताचा काळ तसा नाही. आम्ही अजूनही असे मानतो की, देश छोटा असो वा मोठा, गरीब असो वा श्रीमंत, कमकुवत असो वा मजबूत सर्वजण समान आहेत. जागतिक स्तरावर मुद्द्यांवर सर्व देशांशी सल्लामसलत केल्यानंतरच निर्णय घेतले जावेत, असे चीनच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.
बाबा रामदेव यांना धक्का! भूताननंतर नेपाळमध्ये कोरोनिलवर बंदी; नेमकं कारण काय?
चीनकडून अनेक देशांना धोका!
या जी-७ गटात सहभागी असलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी चीनच्या मुद्द्यावरून चर्चेला सुरुवात केली. त्यांनी सर्व सहभागी देशांना आवाहन केले की, चीनपासून अनेक देशांना धोका आहे आणि हा धोका ओळखून संयुक्तरित्या पावले उचलायला हवीत. तसेच दुसरीकडे जी-७ देशांच्या बैठकीत चीनला रोखण्यासाठी काय उपाय करता येतील, याची रणनीती तयार केली जात असल्याचे सांगितले जात आहे.
वन बेल्ट, वन रोडला विरोध
जी-७ गटांच्या देशांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या वन बेल्ट, वन रोड या योजनेलाही विरोध दर्शवला आहे. ही योजना पूर्ण झाली नाही, तर चीनला हजारो कोटी डॉलरचे नुकसान होऊ शकते, असे सांगितले जात आहे. या प्रकल्पासाठी चीनने अनेक देशांना मोठी कर्जे देऊन आपल्या अधीन केले आहे, असा आरोप केला जात आहे. श्रीलंका, पाकिस्तान यांच्यासह अनेक आफ्रिकी देश यापूर्वीच चीनचे आर्थिक गुलाम झाले आहेत, असे सांगितले जात आहे.