नागरीकांच्या अपहरणानंतर चीनने पाकिस्तानला फटकारले
By Admin | Updated: May 26, 2017 18:12 IST2017-05-26T18:11:21+5:302017-05-26T18:12:49+5:30
चीन आणि पाकिस्तानमधील मैत्री दिवसेंदिवस दृढ होत असताना नागरी सुरक्षेवरुन चीनने पाकिस्तानला फटकारल्याचे समोर आले आहे.

नागरीकांच्या अपहरणानंतर चीनने पाकिस्तानला फटकारले
ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. 26 - चीन आणि पाकिस्तानमधील मैत्री दिवसेंदिवस दृढ होत असताना नागरी सुरक्षेवरुन चीनने पाकिस्तानला फटकारल्याचे समोर आले आहे. बलुचिस्तानमधुन दोन चीनी नागरीकांचे दहशतवाद्यांनी अपहरण केल्यानंतर चीनने पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्तानात राहणा-या आपल्या नागरीकांना पुरेशी सुरक्षा उपलब्ध करुन देण्यास चीनने सांगितले आहे.
चीनी नागरीकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपायोजना करा अशी चीनने पाकिस्तानला सूचना केली आहे. सध्या चीन आणि पाकिस्तानमध्ये सीपीईसी इकॉनॉमिक कॉरिडोअरचे काम सुरु आहे. या प्रकल्पाला बलुचिस्तानमध्ये मोठया प्रमाणावर विरोध होत आहे. येणा-या काळात पाकिस्तानमध्ये चीनी नागरीकांची संख्या वाढणार आहे. चीनी सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने या विषयावर लेख लिहीला आहे.
चीन आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत तरीही, चीनी नागरीकांना पाकिस्तानमध्ये लक्ष्य केले जाते असे या लेखात म्हटले आहे. बुधवारी बलुचिस्तानमधून एका चीनी शिक्षिकेचे अपहरण करण्यात आले. आपल्या नागरीकांच्या सुटकेसाठी चीन पूर्ण प्रयत्न करेल असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.
चीनी नागरीकांच्या सुटकेसाठी पाकिस्तानने शक्य ते सर्व करावे असे चीनने म्हटले आहे. मागच्यावर्षी दक्षिण पाकिस्तानात झालेल्या बॉम्ब हल्ल्यात एका चीनी अभियंता जखमी झाला होता. सीपीईसी प्रकल्पाला विरोध करणा-या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. सीपीईसी प्रकल्पावर काम करणा-या चीनी नागरीकांच्या सुरक्षेसाठी 15 हजाराचे सशस्त्र दल तैनात करण्याचे आश्वासन पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी चीनला दिले होते. जवळपास 8 हजार चीनी सध्या पाकिस्तानमध्ये या प्रकल्पावर काम करत आहेत.