आता अफगाणिस्तानात मिलिट्री बेस उभारण्याचा चीनचा 'प्लान'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 05:31 PM2018-02-02T17:31:36+5:302018-02-02T17:37:53+5:30

पाकिस्तानप्रमाणे चीन आता अफगाणिस्तानच्या दुर्गम भागात लष्करी तळ उभारण्याची योजना आखत आहे. चीनची या संदर्भात अफगाणिस्तानबरोबर बोलणी सुरु आहेत.

China plans to set up military base in Afghanistan | आता अफगाणिस्तानात मिलिट्री बेस उभारण्याचा चीनचा 'प्लान'

आता अफगाणिस्तानात मिलिट्री बेस उभारण्याचा चीनचा 'प्लान'

Next
ठळक मुद्दे. वाखान अफगाणिस्तानचा भाग असला तरी तिथे राहणा-या नागरिकांना अफगाणिस्तानच्या अन्य भागांमध्ये सुरु असलेले युद्ध, हिंसाचाराची कल्पना नसते.राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा चीनचा आर्थिक आणि भूराजकीय विस्तार करण्यावर भर आहे.

काबूल - पाकिस्तानप्रमाणे चीन आता अफगाणिस्तानच्या दुर्गम भागात लष्करी तळ उभारण्याची योजना आखत आहे. चीनची या संदर्भात अफगाणिस्तानबरोबर बोलणी सुरु आहेत. अफगाणिस्तानचा वाखान कॉरिडोअर चीनच्या शिनजियांग प्रांताला लागून आहे. वाखानमार्गे दहशतवादी शिनजियांगमध्ये शिरु शकतात अशी भिती चीनला आहे. त्यामुळे चीन अफगाणिस्तानच्या डोंगराळ भागाने व्यापलेल्या वाखान भागात लष्करी तळ उभारण्याच्या तयारीत आहे. 

सध्या या भागात चिनी आणि अफगाणी सैनिकांना संयुक्तपणे गस्त घालताना पाहण्यात आले आहे. वाखान अफगाणिस्तानचा भाग असला तरी तिथे राहणा-या नागरिकांना अफगाणिस्तानच्या अन्य भागांमध्ये सुरु असलेले युद्ध, हिंसाचाराची कल्पना नसते. इथले नागरिक शांततेत आपले जीवन जगत आहेत. वाखानमधल्या लोकांचे शिनजियांग प्रांतातील नागरिकांशी दृढ संबंध आहेत. 

राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा चीनचा आर्थिक आणि भूराजकीय विस्तार करण्यावर भर आहे. दक्षिण आशियामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर चीन अब्जावधी डॉलर खर्च करत आहे. शिनजियांगमध्ये अशांतता असून वाखानमधून तेथे अस्थिरता निर्माण करता येऊ शकते. त्यामुळे चीन अफगाणिस्तानात लष्करी तळ उभारण्याच्या विचारात आहे. इराक आणि सीरियामधून पळालेले इसिसचे दहशतवादी वाखानमार्गे चीनमध्ये घुसू शकतात असे तज्ञांचे मत आहे त्यामुळे चीनची चिंता वाढली आहे. 
 

पाकिस्तानात तळ उभारण्याचे प्रयत्न 
 चीन पाकिस्तानमध्ये लष्करी तळ उभारण्याची शक्यता आहे. वॉशिंग्टन टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार चीनची या संदर्भात पाकिस्तानबरोबर चर्चा सुरु आहे. पाकिस्तानने परवानगी दिल्यास चीनचा हा परदेशातील दुसरा लष्करी तळ ठरेल. याआधी आफ्रिका खंडातील डिजीबाऊटी या देशात चीनने आपला पहिला लष्करी तळ उभारला आहे. पाकिस्तानात जिवानी बंदरावर लष्करी तळ उभारण्याचा चीनचा प्रयत्न आहे.
 

Web Title: China plans to set up military base in Afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन