चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 20:15 IST2025-12-12T20:14:49+5:302025-12-12T20:15:37+5:30
चीन आणि रशियाच्या संयुक्त हवाई गस्तीनंतर, अमेरिका आणि जपानने ही गस्त घातली आहे...

चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
प्रशांत महासागरात दोन महाशक्तींमधील तणाव सातत्याने वाढताना दिसत आहे. चीन आणि रशियाने नुकत्याच केलेल्या उत्तेजक हवाई गस्तीला प्रत्युत्तर म्हणून, आता अमेरिकेने जपानच्या समर्थनार्थ आपले अत्यंत घातक असे B-2 स्टील्थ बॉम्बर (B-2 Bomber) उतरवले आहेत. अमेरिकेचे B-2 बॉम्बर 'ईस्ट चायना सी' भागात जपानच्या F-35 आणि F-15 सह एकूण १० लढाऊ विमानांसोबत गस्त घालताना दिसले, याचा व्हिडीओही जारी करण्यात आला आहे. चीन आणि रशियाच्या संयुक्त हवाई गस्तीनंतर, अमेरिका आणि जपानने ही गस्त घातली आहे.
चीन-रशियाची संयुक्त गस्त -
याच आठवड्यात मंगळवारी चीन आणि रशियाच्या हवाई दलांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात संयुक्त हवाई गस्त घातली होती. यात रशियाचे TU-95 स्ट्रॅटेजिक मिसाईल कॅरियर (बॉम्बर) आणि चीनचे H-6 बॉम्बर्स ईस्ट चायना सी, जपानचा समुद्र आणि पश्चिम प्रशांत महासागरात गस्त घालत होते. यावेळी, रशियाचे सु-30, सु-35 आणि चीनचे जे-16 फायटर जेटने या बॉम्बर्सना कव्हर दिले होते. या कारवाईला जपान आणि दक्षिण कोरियाने कडाडून विरोध केला. एवढेच नाही, तर हा जपानविरोधात शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न असल्याचे जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइजुमी यांनी म्हटले होते.
चीनचे लियाओनिंग विमानवाहू जहाज याच क्षेत्रात तैनात -
जपान ईस्ट चायना सीमध्ये आपले संरक्षण क्षेत्र मजबूत करत असताना आणि तैवानवर चीनने हल्ला केल्यास मदत करण्याची घोषणा केली असताना, चीनने आपले लियाओनिंग हे विमानवाहू जहाज याच क्षेत्रात तैनात केले आहे. दरम्यान, चीन आणि जपानने एकमेकांच्या फायटर जेट्सवर रडार जाम करण्याचा आरोपही केला होता.