डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून, त्यांचे धोरण आणि घेतलेले निर्णय सातत्याने चर्चेत आहेत. ट्रम्प यांनी एकापाठोपाठ एक अनेक देशांवर भरमसाठ टॅरिप आकारले. याशिवाय इतरही अनेक मोठे निर्णय घेतले. त्यांनी नुकतेच, व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना राजधानी काराकास येथून ताब्यात घेतले. व्हेनेझुएला सरकार आंतरराष्ट्रीय सुरक्षिततेसाठी धोकादायक बनत चालले होते. तसेच तेथून अमेरिकेविरोधात कटकारस्थान रचले जात होते, असे अमेरिकेचे म्हणणे होते.
ट्रम्प यांचा आरोप आहे की, व्हेनेझुएला अमेरिकेत कोकेन आणि फेंटेनाइल सारख्या घातक ड्रग्सच्या तस्करीचा मार्ग बनला आहे. ही समस्या सोडवण्यासाठी मादुरो यांना पदच्चूत करणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर, मादुरो यांच्या धोरणांमुळे व्हेनेझुएलाच्या लाखो नागरिकांना आपला देश सोडून अमेरिकेत यावे लागले आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. याशिवाय, ट्रम्प सातत्याने ग्रीनलँडवर अमेरिकेचा अधिकार सांगत आहे. या घटनांनंतर, आता चीनने ट्रम्प यांच्या धोरणांवर आणि निर्णयांवर खिल्ली उडवत निशाणा साधला आहे.
चिनी सरकारी माध्यमांनी उडवली खिल्ली - चीनच्या सरकारी माध्यमाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ट्रम्प यांच्या निर्णयांची अत्यंत भयंकर खिल्ली उडवण्यात आली आहे. व्हिडियोसोबत लिहिण्यात आले आहे, "मला वाटते, तेच करणार.' या व्हिडिओमध्ये ग्रीनलँडचामुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय कायद्याचीही व्यंग्यात्मक पद्धतीने खिल्ली उडवण्यात आली आहे. चीनचा हा व्हिडिओ, ट्रम्प यांच्या या आक्रमक परराष्ट्र धोरणाची आणि एकतर्फी निर्णयांची खिल्ली उडवत निशाणा साधणार आहे.
ग्रीनलँडसंदर्भात टोकाची भूमिका - ग्रीनलँडसंदर्भात बोलताना ट्रम्प म्हणतात, रशिया आणि चीनला ग्रीनलँडवर कब्जा करण्यापासून रोखण्यासाठी, ग्रीनलँड अमेरिकेला आपल्या नियंत्रणात घ्यावे लागेल. केवळ भाड्याने घेणे पुरेसे नाही. ग्रीनलँड अमेरिकेच्या ताब्यात असेल, तरच त्याचे योग्य पद्धतीने संरक्षण केले जाऊ शकते. अमेरिका ते सोप्या पद्धतीने अथवा कठोर पावले उचलत मिळवेल.