चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 06:10 IST2026-04-13T06:09:54+5:302026-04-13T06:10:12+5:30
China News: चीनने पाकव्याप्त काश्मीर आणि अफगाणिस्तान सीमेजवळ शिनजियांग प्रांतात २६ मार्च रोजी सानलिंग हा एक नवीन प्रशासकीय विभाग (काउंटी) स्थापन केला आहे.

चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
बीजिंग - चीनने पाकव्याप्त काश्मीर आणि अफगाणिस्तान सीमेजवळ शिनजियांग प्रांतात २६ मार्च रोजी सानलिंग हा एक नवीन प्रशासकीय विभाग (काउंटी) स्थापन केला आहे. फुटीरवादी उइगर दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी व अरुंद वाखान कॉरिडॉरमधील सुरक्षा वाढवण्यासाठी चीनने हे पाऊल उचलले आहे.
काराकोरम पर्वतरांगेजवळ पाकव्याप्त काश्मीर आणि अफगाणिस्तानच्या सीमेला लागून हा विभाग असून, सामरिकदृष्ट्या ही काउंटी महत्त्वाची ठरणारी आहे. चीनने स्थापन केलेली ही तिसरी नवीन काउंटी आहे.
अरुणाचलबाबत चीनच्या प्रयत्नांना भारताने फटकारले
अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनच्या प्रयत्नांबद्दल भारताने रविवारी कठोरपणे फटकारले. असे दावे किंवा निराधार कथा हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे वास्तव बदलू शकत नाही, असे भारताने म्हटले आहे. चीनने दोन्ही देशांतील संबंधांमध्ये बाधा आणणाऱ्या अशा कृतीपासून दूर राहावे, असा सल्लाही भारताने दिला आहे.
भारताने नोंदवला निषेध
भारताने गेल्या वर्षी हेआन आणि हेकांग काउंटींच्या निर्मितीवर चीनकडे निषेध नोंदवला होता. कारण या दोन्ही विभागातील काही भाग लडाख या केंद्रशासित प्रदेशात येतो. हेआनमध्ये अक्साई चीन पठाराचा बराच भाग येतो.
तैवानसाठी थेट विमानसेवा
चीन शेजारी देश तैवानवर आपला अधिकार सांगत असल्यामुळे दोन्ही देशांतील संबंध संपुष्टात आले होते. मात्र, चीनने तैवानसंदर्भात रविवारी महत्त्वाची घोषणा केल्याने संबंध सुधारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.