चीनला भूकंपाचा धक्का; १७५ मृत्युमुखी

By Admin | Updated: August 4, 2014 01:58 IST2014-08-04T01:58:23+5:302014-08-04T01:58:23+5:30

चीनच्या युन्नान प्रांतात रविवारी झालेल्या भूकंपात १७५ जणांचा बळी गेला,

China earthquake shocks; 175 killed | चीनला भूकंपाचा धक्का; १७५ मृत्युमुखी

चीनला भूकंपाचा धक्का; १७५ मृत्युमुखी

बीजिंग : चीनच्या युन्नान प्रांतात रविवारी झालेल्या भूकंपात १७५ जणांचा बळी गेला, तर १४०० नागरिक जखमी झाले. ६.५ रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेच्या या भूकंपाने भीषण जीवित आणि वित्तहानी घडवून आणली आहे.
लुदिआन भागात १२० जण मृत्युमुखी पडले, तर १८१ नागरिक बेपत्ता असून १३०० जण जखमी झाले आहेत. १२ हजारांहून अधिक घरे भुईसपाट झाली असून ३० हजार घरांची हानी झाली आहे. लुदिआन प्रांतातील विद्युत पुरवठा व दूरध्वनी संपर्क खंडित झाला आहे. या भूकंपाने क्विआओजिआ भागातही ३० जणांचा बळी घेतला असल्याचे चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने म्हटले आहे.
लोंगटोउशाननगरातील बचाव व मदत मोहिमेत सहभागी झालेल्या मा हाओ या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने परिस्थिती भयंकर असल्याचे सांगितले. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आपण ४० जिवंत व्यक्तींना बाहेर काढले आहे. मला ढिगाऱ्याखाली अनेक मृतदेह दिसून आले. प्रामाणिकपणे सांगतो या मृतदेहांची काळजी घेण्यास आमच्याकडे वेळ नाही ही खरच शरमेची बाब आहे. मात्र, सर्वप्रथम जिवंत व्यक्तींना मदत करणे आमचे कर्तव्य आहे, असे तो म्हणाला.
भूकंपाचा केंद्रबिंदू १२ किमी खोलीवर होता, असे चीन भूकंप केंद्राने म्हटले आहे. मला माझ्या पाच मजली घरात जोराचा धक्का बसला आणि काही वस्तू खाली पडल्या, असे लुडियान भागातील एका नागरिकाने सांगितले. भूकंपानंतर बहुतांश नागरिक घाबरून घरातून रस्त्यावर आले. मा लिया या महिलेने सांगितले की, बॉम्बहल्ल्यानंतर रणभूमीची जशी अवस्था होते तशीच अवस्था रस्त्यांची झाली आहे. माझ्या शेजाऱ्याचे नवे दोन मजली घर भुईसपाट झाले आहे.
झाओटोंग शहराने ३०० पोलीस आणि अग्निशमन कर्मचाऱ्यांना भूकंपग्रस्त भागात रवाना केले आहे. याशिवाय ३९२ बचाव कर्मचारी आणि १२ शोधक श्वानही पाठविण्यात आले आहेत. नागरी व्यवहार प्रशासनाने दोन हजार तंबू, ३ हजार बिछाने व इतर साहित्य पाठवले आहे. लुडियान भागात सात नगरे असून दोन लाख ६५ हजार ९०० एवढी तेथील लोकसंख्या आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: China earthquake shocks; 175 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.