चीनचा पुन्हा अडेलपणा! कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी WHO च्या वैज्ञानिकांना वटवाघळांच्या गुहेपर्यंत जाण्यास रोखलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 20:18 IST2021-10-12T20:18:25+5:302021-10-12T20:18:54+5:30
चीननं (China) जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) वुहान येथील वटवाघळांच्या गुहेत (Bats Caves) संशोधन करण्यास नकार दिला आहे.

चीनचा पुन्हा अडेलपणा! कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी WHO च्या वैज्ञानिकांना वटवाघळांच्या गुहेपर्यंत जाण्यास रोखलं
चीननं (China) जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) वुहान येथील वटवाघळांच्या गुहेत (Bats Caves) संशोधन करण्यास नकार दिला आहे. कोरोना विषाणूचं मूळ शोधण्यासाठी वुहानस्थित वटवाघळांच्या गुहांमध्ये महत्त्वाचे धागेदोरे हाती लागू शकण्याची शक्यता आहे. त्यामुळे डब्ल्यूएचओच्या वैज्ञानिकांना या गुहांमध्ये जाऊन संशोधन करायचं आहे. वैज्ञानिकांना हुबेई प्रांतातील एंशी परिसरातील गुहांमध्ये आणि वन्यजीवांच्या शेतीच्या क्षेत्रातील परिसराचा दौरा करायचा आहे. मूळ शहरापासून ही जागा जवळपास सहा तासांच्या अंतरावर आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण वुहान येथेच आढळून आला होता.
वुहान येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर जगभरात कोरोनाचे रुग्ण आढळू लागले होते. संपूर्ण जगभरात या विषाणूनं कहर केला. यात सर्व देशांच्या अर्थव्यवस्थांना देखील मोठा फटका बसला. लाखो लोकांना आपला जीव गमावावा लागला. कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आता जवळपास दीड वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. पण हा विषाणू नेमका आला कुठून? विषाणू प्रयोगशाळेतून बाहेर पडला की वटवाघळांपासून मनुष्यापर्यंत पोहोचला याचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी WHO च्या वैज्ञानिकांना वुहानमधील वटवाघळांच्या गुहेत संशोधन करायचं आहे.
कोरोना विषाणूचं उगामस्थान देशाबाहेरच, चीनचा दावा
वॉशिंग्टन पोस्टच्या माहितीनुसार, डब्ल्यूएचओच्या वैज्ञानिकांना ज्या परिसरात संशोधन करायचं आहे त्या परिसरात जंगली प्राण्याच्या वास्तव्यासाठी ओळखला जातो. इथं पकडण्यात आलेल्या वन्यजीवांची बाजारा विक्री केली जाते. याच ठिकाणाहून वटवाघळांमधून वन्य प्राण्यांमध्ये आणि प्राण्यांमधून मनुष्यात कोरोना विषाणूचं संक्रमण झालं आहे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण चीनी अधिकाऱ्यांनी डब्ल्यूएचओच्या वैज्ञानिकांना संशोधन करण्याची परवानगी दिलेली नाही. कोरोना विषाणूचं पहिलं प्रकरणं चीनमध्ये आढळण्याच्या वृत्ताचं चीन आजवर खंडन करत आला आहे. कोरोना विषाणूचं उगमस्थान देशाबाहेर असल्याचा दावा चीननं केला आहे.