चीनमध्ये महिलांच्या अंतर्वस्त्रांचं प्रमोशन करताहेत पुरुष!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 12:58 PM2023-03-11T12:58:03+5:302023-03-11T12:58:45+5:30

महिलांची अंतर्वस्त्रे परिधान करून हे पुरुष ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीम शॉपिंग प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना ही उत्पादने विकत घेण्यासाठी आवाहन करताहेत..

China bans women from modelling for lingerie men support industry by wearing push up bras | चीनमध्ये महिलांच्या अंतर्वस्त्रांचं प्रमोशन करताहेत पुरुष!

चीनमध्ये महिलांच्या अंतर्वस्त्रांचं प्रमोशन करताहेत पुरुष!

googlenewsNext

काही पुरुषांनी ब्रा घातली आहे, महिलांची नाईटी तसेच महिलांचा गाऊन घालून काही पुरुष बायकी हावभाव करताहेत. महिलांची अंतर्वस्त्रे परिधान करून हे पुरुष ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीम शॉपिंग प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना ही उत्पादने विकत घेण्यासाठी आवाहन करताहेत..

काय आहे हे? - हा आहे चीनमधला एक नवा प्रकार. म्हटलं तर हा प्रकार जगभरात कुठेही तसा नवीन नाही. लाइव्ह स्ट्रीम हा इ-कॉमर्सचाच एक आधुनिक प्रकार आहे. या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अनेक मॉडेल्स त्या त्या उत्पादनांची, अंतर्वस्त्रांची जाहिरात करत असतात. वेबिनार, लाइव्ह व्हीडिओ आणि पाॅडकास्टच्या माध्यमातून इथे रिअल टाइम शॉपिंग केलं जातं. मॉडेलनं परिधान केलेले जे कपडे, अंतर्वस्त्रं ग्राहकांना आवडतात, ते ही उत्पादनं लगेच, ऑनलाइन खरेदी करतात. बऱ्याच ठिकाणी महिलांच्या अंतर्वस्त्रांच्या विक्रीसाठी महिला मॉडेल्सचाच उपयोग केला जातो..

- पण मग चीनमधल्या या ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीम शॉपिंग प्लॅटफॉर्मवर बायकांची अंतर्वस्त्रं परिधान करून पुरुष असे बायकी हावभाव का करताहेत? त्याचं कारण हा देश आहे चीन! ते काहीही करू शकतात! असंही चीननं आपल्या सगळ्याच गोष्टी पोलादी साखळदंडांनी बांधून ठेवल्या आहेत. त्यात इंटरनेटचाही समावेश आहे. महिलांच्या नग्नतेचं प्रदर्शन या लाइव्ह स्ट्रीम शॉपिंगच्या माध्यमातून होऊ नये, असा फतवा काही दिवसांपूर्वीच चीन सरकारनं काढला आणि महिलांना या ऑनलाइन शॉपिंगवर प्रमोशन करण्यास बंदी घातली.

झालं! रातोरात या प्लॅटफॉर्मवरुन महिला गायब झाल्या. पण महिलांची ही उत्पादनं, अंतर्वस्त्रं विकायची, त्यांचं प्रमोशन करायचं तर मग कसं? यावर उत्पादकांनी नवा पर्याय शोधला. महिलांच्या अंर्तवस्त्रांचं जे प्रमोशन पूर्वी महिला मॉडेल करत होत्या, त्यांच्या जागी त्यांनी पुरुष मॉडेल्सना उभं केलं! या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर महिलांची अंतर्वस्त्रं परिधान करून आता पुरुष फिरताहेत, त्याचं कारण हेच. पुरुष मॉडेल्सही याला तयार झालेत, कारण त्यासाठी त्यांना मिळणारा पैसा! या प्रकाराबाबत उत्पादकांवर टीकाही झाली. महिलांना एका क्षेत्रातून तुम्ही थेट बादच करून टाकलं, अनेक मॉडेल्सच्या चरितार्थाचा, उदरनिर्वाहाचा मार्गच बंद करून टाकला, याबद्दल त्यांना धारेवरही धरलं.. पण बऱ्याच उत्पादकांचं म्हणणं होतं, यात आमचा काय दोष? सरकारनं जर ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीम शॉपिंगचं मॉडेलिंग करण्यासाठी महिलांवर थेट बंदीच घातली, तर आम्ही तरी काय करणार? .. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुन महिला मॉडेल्स गायब झाल्या असल्या तरी महिला अंतर्वस्त्रांचं प्रमोशन करणाऱ्या पुरुष मॉडेल्सनाही ग्राहकांची पसंती मिळते आहे. महिलांच्या जागी पुरुष आले, तरीही अंतर्वस्त्रांच्या ऑनलाइन विक्रीला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

महिलांच्या नग्नतेला बंदी घालताना सरकारनं महिलांना या प्रमोशनसाठी बाद केलं असलं, त्यावर सेन्सॉरशीप आणली असली तरी त्यावरही लगेच पळवाटा शोधल्या गेल्या. महिला अंतर्वस्त्राचे उत्पादक आणि विक्रेत्यांनी महिलांच्या पुतळ्यावरच (mannequins) आता अंतर्वस्त्रे चढवली आहेत. काहींनी तर त्याहीपुढे जाऊन एक हटके पर्याय शोधला आहे. त्यामुळेच नवा कायदा जारी झाला, तरीही अनेक महिला मॉडेल्स अजूनही महिलांच्या अंतर्वस्त्रांचं प्रमोशन करताहेत, तेही ही अंतर्वस्त्रे परिधान करूनच! शिवाय कायद्याचा कोणताही भंग न करता! अनेकांना वाटेल, हे कसं शक्य आहे? पण ज्या महिलांनी अंतर्वस्त्रांचं प्रमोशन अजूनही सुरूच ठेवलं आहे. अंगावर टी-शर्ट, पँट चढवून त्यावर ब्रा, स्लीप वगैरे कपडे परिधान करून त्या आता महिलांच्या अंतर्वस्त्रांचं प्रमोशन करताहेत! महिला उत्पादनांचं प्रमोशन पुरुषांनी करण्याचा प्रकार चीनमध्येही रूढ आहे. इंटरनेट सेलेब्रिटी ‘लिपस्टिक किंग’ ऑस्टिन ली जियाकी यानं तर २०१८ मध्ये लाइव्ह स्ट्रीमद्वारे केवळ पाच मिनिटांत १५ हजार लिपस्टिक्सची विक्री केली होती!

डॉक्टरांना भेटायचंय?- ‘तिकीट’ काढा! 
चीनमध्ये असे अनेक नियम आहेत, ज्याबद्दल जगातल्या अनेकांना आश्चर्य वाटतं. चीनमध्ये डॉक्टरांना तब्येत दाखवायची, तर आधी ‘तिकीट’ काढावं लागतं. ॲडव्हान्स रजिस्ट्रेशन तिकीट काढल्यानंतरच त्यांना डॉक्टरांना भेटता येतं. आधी तिकीट काढलं नसेल तर रांगेत उभं राहून तिकीट काढायचं आणि मग डॉक्टरांना भेटायचं! चीनमध्ये ‘हूकोऊ सिस्टीम’ आहे. यानुसार तिथल्या कोणत्याही नागरिकाला देशातल्याच इतर प्रांतात जायचं असेल आणि तिथे तीन दिवसांपेक्षा जास्त राहायचं असेल, तर त्याला टेम्पररी रेसिडेंट परमिट काढावं लागतं!

Web Title: China bans women from modelling for lingerie men support industry by wearing push up bras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.