रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 06:42 IST2025-05-25T06:41:06+5:302025-05-25T06:42:49+5:30
चॅटजीपीटीने केलेल्या मदतीमुळे अमेरिकेतील कॉलिंगहॅम येथील एका रुग्णांची लुबाडणूक टळली आहे.

रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
न्यूयॉर्क: अवाजवी बिल आकारणे, विनाकारण जादा शुल्क वसूल करणे अशा प्रकारच्या कृत्याला सामान्य नागरिकांना अनेकदा सामाेरे जावे लागत असते. हे पैसे वसूल करताना खासगी एजन्सी अजिबात दयामाया दाखवत नाहीत. अशा प्रकारात तक्रारीनंतर पाठपुरावा करूनही यश मिळत नाही. परंतु चॅटजीपीटीने केलेल्या मदतीमुळे अमेरिकेतील कॉलिंगहॅम येथील एका रुग्णांची अशी लुबाडणूक टळली आहे.
चॅटजीपीटीने सडेतोड युक्तिवाद करीत या रुग्णाला दंडापोटी देय असलेली मोठी रक्कम मिळाली आहे. युक्तिवादामुळे रद्द झालेल्या बुकिंगसाठी २,५०० डॉलर (सुमारे २ लाख रुपये) परत मिळाले.
चॅटजीपीटीने काय केले?
मेडेलिन यांनी मेडिकल इंजिनीअर असलेल्या मित्राच्या मदतीने चॅटजीपीटीची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्या मित्राने एक प्रोग्राम डिझाइन केला आहे, जो चॅटजीपीटीच्या आधारे काम करतो. चॅटजीपीटीने एअरलाइनच्या नियम व अटींचा सखोल अभ्यास करून त्याविरोधात काही तर्कसंगत मुद्दे मांडले. चॅटजीपीटीने मेडेलिन यांच्या सध्याच्या आरोग्याच्या स्थितीवर आधारित कायदेशीर मुद्दे सादर करीत या व्यक्तीला प्रवास करणे अशक्य असल्याचे सांगितले. हा युक्तिवाद हॉटेल तसेच विमान कंपनीला मान्य करावा लागला.
तरीही टाळाटाळ सुरू
एअरलाइन कंपनीने मृत्यू, अपघात किंवा मानसिक आरोग्याची सबळ कारणे असतील तरच परतावा देण्याचे धोरण असल्याचे सांगितले. त्यावर चॅटजीपीटीने मेडेलिन यांची आरोग्य स्थिती गंभीर असल्याचे पटवून दिले.
कशी झाली फसवणूक?
मेडेलिन नामक व्यक्तीला जनरलाइज्ड एन्झायटी डिसऑर्डर (जीएडी) आजार होता. याचा त्रास अचानक उफाळून आल्याने मेडेलिन यांना आपले हॉटेल आणि विमानप्रवासाचे बुकिंग रद्द करावा लागले. मेडेलिन यांनी बुकिंग वेळी करताना आजाराची माहिती देणारे डॉक्टरांचे प्रमाणपत्रही सोबत जोडले होते; परंतु मेडेलिन यांनी योग्य विमा न घेता तिकीट रद्द केल्याचे कारण पुढे करीत संबंधित हॉटेल आणि विमान कंपनीने तिकिटाचे पैसे परत करण्यास नकार दिला होता.