बर्दवान स्फोट : सूत्रधाराची पत्नी अटकेत
By Admin | Updated: November 24, 2014 09:20 IST2014-11-24T02:01:43+5:302014-11-24T09:20:50+5:30
बर्दवान स्फोटाच्या मुख्य सूत्रधाराची पत्नी व बांगलादेशातील जेएमबी संघटनेच्या महिला विभागाची प्रमुख फातेमा बेगमला इतर तिघांसह आज बांगलादेशात अटक करण्यात आली आहे

बर्दवान स्फोट : सूत्रधाराची पत्नी अटकेत
ढाका : बर्दवान स्फोटाच्या मुख्य सूत्रधाराची पत्नी व बांगलादेशातील जेएमबी संघटनेच्या महिला विभागाची प्रमुख फातेमा बेगमला इतर तिघांसह आज बांगलादेशात अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर इतर पाच दहशतवाद्यांनाही अटक झाली असून त्यात एक पाकिस्तानी नागरिक आहे. बांगलादेश पोलिसांनी दहशतवाद्याविरोधातील मोहीम कडक केली असून मोठ्या प्रमाणावर धरपकड करण्यात आली आहे.
फातेमा बेगम ही बर्दवान स्फोटातील प्रमुख आरोपी साजीद याची पत्नी असून, तिने भारतात २५ महिला दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याचे कबूल केले आहे, असे ढाका पोलीस उपायुक्त मसुदार रेहमान यांनी सांगितले. फातेमा बेगम बांगलादेशातील जमात उल मुजाहिदीन या संघटनेच्या महिला विभागाची प्रमुख आहे. बर्दवान येथे २ आॅक्टोबर रोजी स्फोट झाला होता व त्यात दोन जण मरण पावले होते. ढाका शहरातील सदरघाट परिसरात तीन सहकारी, स्फोटके व बॉम्ब बनविण्याच्या साहित्यासह तिला अटक करण्यात आली आहे, असे वृत्त डेली स्टारने दिले आहे. पोलीस प्रवक्ता मोनीरुल इस्लाम याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय तपास संस्था एनआयएने फातेमा बेगमची बरीच माहिती दिली होती.
एनआयएच्या पथकाने बर्दवान स्फोटासंदर्भात चौकशी करण्यासाठी गेल्या आठवड्यात बांगलादेशला भेट दिली होती. बांगलादेश पोलिसांना १५ मोबाईल फोन नंबर व इतर साहित्य देऊन तपासाला मदत केली होती. (वृत्तसंस्था)