बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 06:19 IST2025-12-23T06:19:26+5:302025-12-23T06:19:36+5:30
पोलिसांनी या हत्येप्रकरणात गुन्हा नोंद केला असून त्याच्या हत्येमागील कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, या हल्ल्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे.

बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
ढाका : २०२४ साली बांगला देशात झालेल्या विद्यार्थी उठावातील एक प्रमुख नेता मोतलाब शिकदार यांची सोमवारी काही अज्ञात बंदुकधाऱ्यांनी
खुलना शहरात हत्या केली. काही दिवसांपूर्वीच शेख हसिना सरकारच्या विरोधात उठाव करणाऱ्या शरीफ उस्मान हादी याची हत्या झाली होती, त्यानंतरची हत्या करण्यात आलेला शिकदार हा दुसरा नेता आहे. ही हत्या झाल्यानंतर खबरदारी म्हणून आसाम सरकारने राज्यात हाय अलर्ट दिला आहे.
शिकदार हा नॅशनल सिटीझन पार्टीचा खुलगा प्रभागाचा मुख्य संयोजक होता. हल्लेखोराने शिकदार याच्या डोक्याच्या डाव्या भागाजवळ गोळ्या झाडल्या. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत शिकदारला रुग्णालयात नेण्यात आले पण उपचार करत असताना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या हत्येप्रकरणात गुन्हा नोंद केला असून त्याच्या हत्येमागील कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, या हल्ल्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे.
हादीच्या हल्लेखोराचा शोध सुरू, ठावठिकाणा सापडेना
हादीवर गोळ्या झाडणाऱ्या हल्लेखोराबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही, असे बांगला देश पोलिसांनी सोमवारी स्पष्ट केले. शनिवारी हादी याच्या इन्कलाब मंच पार्टीने सरकारला २४ तासाची मुदत दिली होती. या मुदतीत हादी याच्या हल्लेखोराला अटक न केल्यास निदर्शने केली जातील, असा इशारा या पक्षाने दिला होता.
या पार्श्वभूमीवर बांगलादेश गृहखात्याने एक पत्रकार परिषद घेऊन फैसल करीम मसूद या हल्लेखोराने हादी याच्यावर गोळ्या चालवल्याचा संशय व्यक्त केला आहे. पण मसूद कुठे आहे याची माहिती पोलिसांना अद्याप मिळालेली नाही.