सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 08:52 IST2025-12-14T08:52:22+5:302025-12-14T08:52:47+5:30
संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, ही घटना ‘भयानक कृत्य’ असल्याचे म्हटले आहे.

सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
युद्धग्रस्त सुदानमध्ये कार्यरत असलेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या कर्मचाऱ्यांवर झालेल्या भयानक ड्रोन हल्ल्यात सहा शांतता दूत ठार झाले आहेत, तर अन्य आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. दक्षिण कोर्डोफान भागातील काडुगली येथे असलेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयाच्या इमारतीला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला.
वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात बळी पडलेले सर्व सहा पीसकीपर्स हे बांगलादेशचे नागरिक होते. हा हल्ला इमारतीच्या आत असतानाच झाला. संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, ही घटना ‘भयानक कृत्य’ असल्याचे म्हटले आहे.
सुदानच्या सरकारने या प्राणघातक हल्ल्यासाठी विद्रोही निमलष्करी गट रॅपिड सपोर्ट फोर्सेसला जबाबदार धरले आहे. पोर्टसुदान येथील सेना-समर्थित प्रशासनाने संयुक्त राष्ट्राच्या इमारतीवर झालेला हल्ला हे एक ‘धोकादायक आव्हान’ असल्याचे म्हटले आहे. सुदानमध्ये एप्रिल २०२३ पासून RSF आणि सुदानी सैन्यामध्ये भीषण युद्ध सुरू आहे.
काडुगलीसारख्या रणनीतिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहरात गेल्या दीड वर्षांपासून नाकेबंदी सुरू आहे. अन्नपुरवठा आणि मूलभूत मानवी गरजा पूर्ण होत नसल्यामुळे येथे नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. अशा गंभीर परिस्थितीत शांतता राखण्यासाठी कार्यरत असलेल्या पीसकीपर्सना लक्ष्य केल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर संतापाचे वातावरण आहे.