अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 08:35 IST2025-12-14T08:35:32+5:302025-12-14T08:35:49+5:30
Brown University shooting: एका हल्लेखोराने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात किमान दोन लोकांचा मृत्यू झाला असून, आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.

अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
अमेरिकेतील रोड आयलँड येथील प्रतिष्ठित ब्राउन युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये शनिवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. बारस अँड हॉली या इमारतीत विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षा सुरू असताना, एका हल्लेखोराने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात किमान दोन लोकांचा मृत्यू झाला असून, आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराची घटना अभियांत्रिकी आणि भौतिकशास्त्र विभागाच्या इमारतीत घडली, जिथे परीक्षा सुरू होत्या. जखमींवर तातडीने उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर आहे. हल्लेखोर काळ्या रंगाचे कपडे घातलेला पुरुष होता आणि घटनेनंतर तीन तासांनीही तो पोलिसांच्या हाती लागलेला नव्हता. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी कॅम्पसमध्ये मोठी शोधमोहीम सुरू केली आहे.
घटनेच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक प्रशासनाने संपूर्ण परिसरात तातडीने 'शेलटर-इन-प्लेस'चे आदेश लागू केले आहेत. विद्यार्थ्यांनी आणि परिसरातील नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वेन्स यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, त्यांनी पीडितांसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.