दुबई: इराणची राजधानी तेहरानमधील प्रतिष्ठित 'एमआयटी' (शरीफ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी) या शैक्षणिक संस्थेवर अमेरिका-इस्रायलच्या हवाई दलाने हल्ले करून इमारतीचा काही भाग उद्ध्वस्त केला. आमच्या देशातील विद्यापीठांवर झालेले हल्ले अत्यंत गंभीर आणि क्लेशदायक घटना असल्याची प्रतिक्रिया इराणने दिली आहे. इस्रायल आणि अमेरिकेने सोमवारी इराणची राजधानी तेहरानवर तुफान बॉम्बहल्ले केले. यात २५ हून अधिक नागरिक ठार झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या नियंत्रणाखाली असलेली होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासाठी दिलेली मुदत संपत मंगळवारी संपत आहे. या पार्श्वभूमीवर इराणने सोमवारी इस्रायल आणि शेजारील आखाती अरब देशांवर क्षेपणास्त्रांचा मारा करून प्रत्युत्तर दिले.
तेहरान हादरले
सोमवारी पहाटे अमेरिका-इस्रायलने तेहरानवर काही भागांत हल्ला केला. यात एक हल्ला शरीफ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी या शैक्षणिक संस्थेवर करण्यात आला, तर एक हल्ला शहरातील प्रसिद्ध आझादी स्क्वेअरजवळ केला. या धुराचे मोठे लोट पाहायला मिळाले. तेहरानच्या नैऋत्येला असलेल्या इस्लामशहर जवळ झालेल्या हल्ल्यात किमान १५ जण ठार झाले. तसेच, कोममधील एका निवासी भागावर झालेल्या हल्ल्यात पाचजणांना आपला जीव गमवावा लागला, तर इतर शहरांमधील हल्ल्यांमध्ये आणखी सहाजण ठार झाले. याव्यतिरिक्त, तेहरानमधील एका घरावर झालेल्या हवाई हल्ल्यात तीन ठार झाले असून, इराणी सरकारी टेलिव्हिजनने याला दुजोरा दिला आहे.
युद्धातील जीवितहानी
- १९०० : इराण
- १,४०० : लेबनॉन
- १४ लाख : विस्थापित
- १९ : इस्रायल
- १३ : अमेरिका
युद्धविषयक अन्य घडामोडी
- इस्रायलमधील स्थिती : इस्रायलच्या हैफा शहरात एका निवासी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दोनजण मृत आढळले आहेत. इराणकडून नवीन क्षेपणास्त्र हल्ले सुरू असतानाही ढिगाऱ्याखाली दबलेल्यांचा शोध सुरू होता.
- उ. कोरियाकडून इराणला शस्त्रास्त्रांचा पुरवठा नाही : दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने (एनआयएस) उ. कोरिया इराणला शस्त्रे किंवा युद्धसामग्री पुरवत नाहीत असे मत व्यक्त केले आहे. ट्रम्प प्रशासनाशी चर्चेची शक्यता टिकवून ठेवण्यासाठी उ. कोरिया सावध भूमिका घेत असावा, असा एनआयएसने अंदाज वर्तवला आहे.
ट्रम्प यांच्या डेडलाइन्स
- पहिली मुदत : २१ मार्च रोजी ट्रम्प यांनी इराणने ४८ तासांच्या आत जलमार्ग पुन्हा उघडला नाही, तर तेथील सर्व छोटे-मोठे वीज प्रकल्प उद्ध्वस्त केले जातील अशी धमकी दिली होती.
- दुसरी मुदत : दोन दिवसांनंतर, ट्रम्प यांनी इराणशी अत्यंत सकारात्मक आणि फलदायी चर्चा झाल्याचे सांगितले आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ले पाच दिवसांसाठी पुढे ढकलल्याची घोषणा केली.
- तिसरी मुदत : २७ मार्च रोजी ट्रम्प यांनी इराणच्या विनंतीनुसार ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले १० दिवसांसाठी पुढे ढकलले जातील अशी घोषणा केली. त्यामुळे नवी मुदत ६ एप्रिल ठरली.
- ४८ तासांचा इशारा : ६ एप्रिलची मुदत जवळ येत असताना, गेल्या शुक्रवारी ट्रम्प यांनी इराणकडे फक्त ४८ तास उरले आहेत, त्यानंतर विध्वंस केला जाईल, अशी धमकी दिली होती.
- ताजी धमकी : रविवारी शिवराळ भाषेत ट्रम्प इराणमध्ये मंगळवार हा ‘पॉवर प्लांट डे’ आणि ‘ब्रिज डे’ असेल, अशी धमकी दिली.
Web Summary : Iran accuses US-Israel of bombing Tehran, including a university. Retaliatory missile strikes hit Israel and Gulf states after bombings. Trump's deadlines regarding the Hormuz Strait loom amidst escalating tensions and threats of further attacks on Iranian infrastructure.
Web Summary : ईरान ने अमेरिका-इजरायल पर तेहरान पर बमबारी का आरोप लगाया, जिसमें एक विश्वविद्यालय भी शामिल है। जवाबी मिसाइल हमलों में इजरायल और खाड़ी देशों को निशाना बनाया गया। होर्मुज जलडमरूमध्य पर ट्रंप की समय सीमा के बीच तनाव बढ़ गया है।