डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; ज्या मुस्लिम देशाला केली मदत, त्यानेचा केला विश्वासघात..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 16:20 IST2025-02-11T16:19:15+5:302025-02-11T16:20:03+5:30
America Setback in Middle East: अमेरिकेची साथ सोडून या देशाने चीनशी हातमिळवणी केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; ज्या मुस्लिम देशाला केली मदत, त्यानेचा केला विश्वासघात..!
Donald Trump Setback in Middle East: भारताचा खास मित्र आणि मध्यपूर्वेतील महत्त्वाचा मुस्लिम देश इजिप्तला चीनकडून J-10CE लढाऊ विमानांची पहिली खेप मिळाली आहे. हे लढाऊ विमान हवेतून हवेत मारा करणाऱ्या प्रगत क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. यापूर्वी इजिप्शियन हवाई दलाच्या ताफ्यात अमेरिकन फायटर जेट F-16 चा समावेश करण्यात आला होता, मात्र आता त्यांनी चीनी लढाऊ विमानाला प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे, चीनने हीच लढाऊ विमाने पाकिस्तानलाही दिली आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन फायटर जेट F-16 च्या जुनाट फ्लीटची जागा घेण्यासाठी इजिप्तने चीनकडून अधिक प्रगत लढाऊ विमाने खरेदी केली आहेत. इजिप्तने 19 ऑगस्ट 2024 रोजी 'चपळ ड्रॅगन' म्हणून ओळखले जाणाऱ्या चीनच्या प्रगत फायटर जेट खरेदी कराराला अंतिम रूप दिले होते. चीनकडून J-10CE लढाऊ विमाने खरेदी करणारा इजिप्त हा पाकिस्ताननंतरचा दुसरा देश आहे. हा इजिप्शियन करार बीजिंग आणि कैरो यांच्यातील वाढती जवळीक दर्शवितो. मात्र, आतापर्यंत इजिप्त आणि चीनने या कराराला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
अमेरिकेची मदत अन् चीनशी व्यवहार!
सप्टेंबर 2024 मध्ये इजिप्तमध्ये आंतरराष्ट्रीय एअर शो आयोजित करण्यात आला होता, त्यात चिनी फायटर जेट J-10CE ठळकपणे प्रदर्शित करण्यात आले होते. चीनकडून लढाऊ विमाने खरेदी करण्याचा इजिप्तचा निर्णय आपल्या रणनीतीत मोठा बदल दर्शवतो. अमेरिका आणि इजिप्तमधील संबंध खूप चांगले आहेत. तरीदेखील अमेरिका आणि रशियाचा प्रस्ताव फेटाळून इजिप्तने चीनशी हातमिळवणी केली आहे. चीनच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स परिषद झाली आणि त्यात इजिप्तचा समावेश झाला. तेव्हापासून दोन्ही देशाची जवळीक वाढली आहे.
चीनच्या J-10CE फायटर जेटची खासियत
चीनचे J-10CE फायटर जेट चेंगडू एअरक्राफ्ट इंडस्ट्री कॉर्पोरेशनने विकसित केले आहे. हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर हल्ला करण्याची क्षमता आहे. हे जेट अॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिकली स्कॅन ॲरे (AESA) रडार, आधुनिक एव्हीओनिक्स आणि PL-10 आणि PL-15 क्षेपणास्त्रे यांसारख्या प्रगत वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की चीनी फायटर जेट J-10CE ची किंमत अमेरिकन F-16 जेटच्या किमतीपेक्षा कमी आहे.