कॅनडातील भारतीय रेस्टॉरंटमध्ये स्फोट, १५ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:32 IST2018-05-26T00:32:44+5:302018-05-26T00:32:44+5:30
तिघे चिंताजनक, दोघांवर पोलिसांचा संशय

कॅनडातील भारतीय रेस्टॉरंटमध्ये स्फोट, १५ जखमी
टोरांटो : कॅनडाच्या टोरांटो शहराजवळील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये गुरुवारी रात्री मोठा स्फोट घडवण्यात आला. त्यात १५ जण जखमी झाले असून, तिघांची प्रकृती गंभीर आहे. रेस्टॉरंटमध्ये आलेल्या दोन जणांनी हा स्फोट घडवून आणल्याचा पोलिसांचा संशय आहे.
टोरांटोजवळील मिसीसॉगा येथे 'बॉम्बे भेल' नावाचे भारतीय रेस्टॉरंट आहे. तिथे गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. तिथे दोन इसम संशयास्पद स्थितीत दिसले होते. ते लगेचच निघून गेले. त्यांच्यापैकी एकाने काळ्या कपड्याने स्वत:चे तोंड झाकून घेतले होते. त्याच्यासोबत जो इसम होता, त्याने स्फोटके रेस्टॉरंटमध्ये ठेवली असावीत. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी हे कळताच कॅनडातील दुतावासाशी संपर्क साधून मदतीचे आदेश दिले. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही स्फोटाची माहिती घेतली. (वृत्तसंस्था)