तालिबाननं २०२१मध्ये सत्ता पुन्हा ताब्यात घेतल्यापासून अफगाणिस्तानची परिस्थिती अधिकाधिक बिकट होत चालली आहे. तालिबानच्या सरंजामशाहीमुळे लोकांचं, विशेषत: महिलांचं जगणं अक्षरश: दुष्कर झालं आहे. लोकांच्या जगण्यावर अधिकाधिक नियंत्रण येत असल्यामुळे लोकही आता तालिबानी जाचाला कंटाळले आहेत. मरणाची भीती असूनही अनेक ठिकाणी लोक आता उघडपणे आवाज उठवू लागले आहेत. तालिबानी फतव्यांचा नवा जाच म्हणजे तालिबाननं संपूर्ण अफगाणिस्तानमध्येइंटरनेट सेवा बंद केली आहे. त्यामुळे तिथलं मोबाइल नेटवर्क ठप्प झालं आहे. लोकांना एकमेकांशी संपर्क साधणं अवघड झालं आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्ला अखुंदजादा लोकांना इशारा देताहेत. त्यांचं म्हणणं आहे, देशात अनैतिकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोक आपली संस्कृती विसरले आहेत. पाश्चिमात्य वाईट चालीरीतींचं सर्रास अनुकरण होतं आहे. विवाहपूर्व आणि विवाहबाह्य संबंध वाढले आहेत. पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे तरुणाई वाईट मार्गाला लागली आहे. इंटरनेट हे त्याचं प्रमुख कारण आहे. ही अनैतिकता रोखण्यासाठीच इंटरनेट बंदीचा निर्णय घेतल्याचं तालिबानचे काही नेते सांगताहेत.
दुसरीकडे तज्ज्ञांचं मात्र म्हणणं आहे, ‘अनैतिकता’ हा एक बहाणा आहे. अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणावर असंतोष उसळला आहे. लोक त्रस्त झाले आहेत. अन्यायाची परिसीमा झाल्यानं लोकांचा संयम सुटला आहे. उठाव करण्याच्या मानसिकतेपर्यंत तिथले लोक आले आहेत. ही परिस्थिती आणखी वाढू नये, इंटरनेटच्या माध्यमातून इतर देशांप्रमाणे इथेही तरुणाईचा उद्रेक होऊ नये म्हणून तालिबान सरकारनं इंटरनेटवर बंदी घातली आहे.
काबुल, हेरात, मजार-ए-शरीफ आणि उरुजगानसह अनेक शहरांमधे फायबर - ऑप्टिक इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. सुरुवातीला मोबाइल डेटा काही वेळापुरता चालत होता. पण, सिग्नल टॉवर बंद झाल्यानं तोही बंद झाला. यापूर्वी बल्ख, कंदहार, हेलमंद, उरुजगान आणि निमरोज इथं फायबर - ऑप्टिक नेटवर्क बंद करण्यात आलं होतं. पण, आता इंटरनेट बंदी पूर्ण देशभर लागू करण्यात आली आहे.
सन २०२४पर्यंत अफगाणिस्तानमध्ये ९,३५० किलोमीटरचं फायबर - ऑप्टिक नेटवर्क होतं, जे पूर्वीच्या सरकारांनी तयार केलं होतं, पण तालिबाननं आता ते पूर्णपणे बंद केलं. या इंटरनेट ब्लॅकआउटमुळं अफगाणिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय कॉल येणं-जाणं मुश्कील झालं आहे. यामुळे अनेक कुटुंबं, व्यापारी आणि मदत संस्थांना एकमेकांशी संपर्क साधणं अवघड झालं आहे. मुलींच्या शिक्षणावर यामुळे आणखीच परिणाम होणार आहे. आधीच अफगाणिस्तानमध्ये मुलींना सहावीच्या पुढे शिकायला बंदी आहे. उच्च शिक्षण, नोकरी वगैरेचा तर संबंधच नाही. ज्या मुली घरी बसून ऑनलाइन शिकत होत्या, त्यांनाही आता ते अशक्य होईल.
तालिबान सरकारनं आपल्या आधीच्या वक्तव्यापासून मात्र यूटर्न घेतला आहे. त्यांचं म्हणणं आहे, आम्ही कोणतीही इंटरनेटबंदी केलेली नाही. जुन्या फायबल ऑप्टिक केबल दुरुस्तीचं काम चालू असल्यानं इंटरनेट काही ठिकाणी बंद आहे. तज्ञांचं मात्र म्हणणं आहे, हा आणखी एक नवा बहाणा आहे.
Web Summary : Taliban's Afghanistan internet ban, citing 'immorality,' sparks outrage. Experts suspect suppressing dissent amid rising discontent. Fiber optic shutdown impacts communication, education.
Web Summary : तालिबान ने 'अनैतिकता' का हवाला देते हुए अफगानिस्तान में इंटरनेट पर प्रतिबंध लगाया, जिससे आक्रोश है। विशेषज्ञों को बढ़ते असंतोष के बीच असहमति को दबाने का संदेह है। फाइबर ऑप्टिक बंद होने से संचार, शिक्षा प्रभावित।