अशी दिसेल जगातील पहिली बिटकॉईन सिटी, अल साल्वाडोरनं जारी केलं डिझाईन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 15:51 IST2022-05-11T15:50:43+5:302022-05-11T15:51:53+5:30
Bitcoin City: अल साल्वाडोरनं गेल्या वर्षी बिटकॉईनला अधिकृत चलनाच्या रुपात मान्यता दिली आहे.

अशी दिसेल जगातील पहिली बिटकॉईन सिटी, अल साल्वाडोरनं जारी केलं डिझाईन
Bitcoin City: मध्य अमेरिकेतील सर्वात लहान देश अल साल्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष नायब बुकेले यांनी बांधकाम सुरू असलेल्या बिटकॉइन शहराचे डिझाइन जारी केले आहे. विकासाचे हे नवे रुप अतिशय सुंदर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. अध्यक्ष बुकेले यांनी सोशल मीडियावर क्रिप्टो शहराच्या मॉडेलचे फोटो शेअर केले आहेत. या शहराची निर्मिती फॉन्सेकाच्या खाडीवर कोंचगुआ ज्वालामुखीच्या जवळ केली जाणार आहे.
बिटकॉईन सिटी ही अल साल्वाडोरच्या राष्ट्रपतींच्या प्रमुख योजनांपैकी एक आहे. याची घोषणा त्यांनी पहिल्यांदा सहा महिन्यांपूर्वी लॅटिन अमेरिकन बिटकॉईन आणि ब्लॉकचेन कार्यक्रमादरम्यान केली होती. सध्या क्रिप्टो बाजारात मंदी सुरू आहे आणि गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत ते आपल्या उच्चांकी पातळीपासून ५० टक्क्यांपर्यंत घसरले आहे. अशा वेळी हे डिझाइन समोर आलं आहे.
Trees everywhere 😍 pic.twitter.com/kVUDHx2DlC
— Nayib Bukele (@nayibbukele) May 10, 2022
या वर्षाच्या अखेरीस बांधकाम सुरू होण्याची शक्यता
या वर्षाच्या अखेरीस बिटकॉइन सिटीचे बांधकाम सुरू होईल, असा अंदाज अल साल्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष नायब बुकेले यांनी व्यक्त केला आहे. बुकेले यांनी क्रिप्टो-सक्षम शहराचे स्केल मॉडेल आणि काही डिझाइन सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
बिटकॉईनला मान्यता देणारा पहिला देश
अल साल्वाडोरने सप्टेंबर महिन्यात बिटकॉईनला कायदेशीररित्या मान्यता दिली होती. असं करणारा तो पहिला देश ठरला होता. या देशानं क्रिप्टोमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या शहरात राहणाऱ्या लोकांना केवळ वॅट द्यावा लागेल. याचाच अर्थ या ठिकाणी कधीही इन्कम टॅक्स लागणार नाही. हे शहर पूर्णपणे बनून कधी तयार होईल याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.