Biometrics appointment procedure for us by b2 business tourist visa | अमेरिकेच्या B1/B2 व्हिसासाठीची बायोमेट्रिक अपॉईंटमेंट प्रक्रिया कशी आहे? 

अमेरिकेच्या B1/B2 व्हिसासाठीची बायोमेट्रिक अपॉईंटमेंट प्रक्रिया कशी आहे? 

प्रश्न- मी अमेरिकेच्या मुंबईतील वकिलातीत अमेरिकेच्या बिझनेस/टुरिस्ट (B1/B2) व्हिसासाठी पहिल्यांदाच अर्ज केला आहे. व्हिसाच्या मुलाखतीआधी मला व्हिसा अ‍ॅप्लिकेशन सेंटरमध्ये बायोमेट्रिक्ससाठी अपॉईंटमेंट घ्यावी लागेल याची मला कल्पना आहे. या अपॉईंटमेंटबद्दल अधिक माहिती देऊ शकता का?

उत्तर- हो, व्हिसा अर्जदारांना बायोमेट्रिक्स अपॉईंटमेंटसाठी वेळ निश्चित करून त्यासाठी व्हिसा अ‍ॅप्लिकेशन सेंटरमध्ये (व्हीएसी) यावं लागतं. तुम्ही बायोमेट्रिक अपॉईंटमेंटसाठी मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद किंवा कोलकाता यामधल्या कोणत्याही व्हिसा अ‍ॅप्लिकेशन सेंटरची (व्हीएसी) वेळ निश्चित करू शकता. तुम्ही एकाच ठिकाणी व्हिसासाठी मुलाखत देणं आणि बायोमेट्रिक नोंदणी करणं गरजेचं नाही. व्हिसा मुलाखतीच्या एक ते पन्नास दिवस आधी तुम्ही बायोमेट्रिक अपॉईंटमेंटची वेळ घेऊ शकता. याबद्दलची अधिक माहिती www.ustraveldocs.com/in/in-niv-appointmentschedule.asp. वर उपलब्ध आहे. 

बायोमेट्रिक्स अपॉईंटमेंटच्या आधी तुम्हाला देण्यात आलेल्या अपॉईंटमेंट पत्रावर दिलेल्या सूचना, विशेषतः सुरक्षेशी संबंधित सूचना काळजीपूर्वक वाचा. व्हीएसीला येताना या पत्रासोबत तुमचा पासपोर्ट, फॉर्म DS-160 (ऑनलाइन नॉनइमिग्रंट व्हिसा अ‍ॅप्लिकेशन) मधील कन्फर्मेशन पेज सोबत घेऊन या. जर तुम्ही तुमच्या 14 वर्षांखालील मुलाच्या व्हिसासाठीही अर्ज करत असाल, तर त्याचा पासपोर्ट, सध्याचा फोटो आणि फॉर्म DS-160 मधील कन्फर्मेशन पेज आणा. तुमच्या मुलाला किंवा मुलीला बायोमेट्रिक अपॉईंटमेंटसाठी येण्याची आवश्यकता नाही.

मुंबईतल्या व्हीएसीमध्ये आल्यावर रांगेत उभे राहा आणि इमारतीच्या प्रवेशाजवळ असलेली सुरक्षा तपासणी करून आत या. व्हीएसी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असून तिथे पोहोचण्यासाठी तुम्ही उजव्या बाजूला असलेल्या एलिव्हेटरचा वापर करू शकता.

व्हीएसीमध्ये तुम्हाला आणखी सुरक्षा तपासणीला सामोरं जावं लागेल. त्यानंतर एक कर्मचारी तुमच्या फॉर्म DS-160 कन्फर्मेशन पेजवरील व्हिसाचा प्रकार, पासपोर्ट क्रमांक आणि इतर माहिती तपासेल. तुम्ही चुकीची माहिती भरली असल्यास तुम्हाला अपॉईंटमेंट आधी तुमचा फॉर्म DS-160 एडिट करावा लागेल किंवा नवा DS-160 फॉर्म भरावा लागेल. 

अपॉईंटमेंटच्या पुढील टप्प्यात व्हीएसीमधील कर्मचारी तुम्हाला बायोमेट्रिक शपथ वाचायला सांगेल. तुम्ही फॉर्म DS-160 मध्ये खरी माहिती दिली असून व्हिसा मुलाखतीमध्येही तुम्ही खरा तपशील द्याल, असा याचा अर्थ होतो. यानंतर व्हीएसी कर्मचारी तुमच्या हाताची बोटं इलेक्ट्रॉनिक स्कॅन करून तुमचा फोटो काढेल. तुमच्या फोटोने काही निकष पूर्ण करायला हवेत. उदाहरणार्थ, तुम्ही चष्मा घालत असल्यास, फोटो काढतेवेळी तो तुम्हाला काढावा लागेल. याबद्दलची अधिक माहिती travel.state.gov/content/travel/en/us-visas/visa-information-resources/photos.html वर उपलब्ध आहे.

बायोमेट्रिक प्रक्रिया या पद्धतीनं पार पडते. यानंतर तुम्ही व्हिसासाठी मुलाखत देऊ शकता.

 

Web Title: Biometrics appointment procedure for us by b2 business tourist visa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.