जगातील सर्वात मोठे विमान चाचणीच्यावेळी कोसळले
By Admin | Updated: August 24, 2016 18:03 IST2016-08-24T18:03:31+5:302016-08-24T18:03:31+5:30
जगातील सर्वात मोठे विमान एअरलँडर १० बुधवारी सकाळी दुस-या उड्डाण चाचणीच्यावेळी कोसळले.

जगातील सर्वात मोठे विमान चाचणीच्यावेळी कोसळले
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २४ - जगातील सर्वात मोठे विमान एअरलँडर १० बुधवारी सकाळी दुस-या उड्डाण चाचणीच्यावेळी कोसळले. 'द फ्लाइंग बम' असे या विमानाला टोपणनाव देण्यात आले होते. लंडनमधील कार्डिंग्टन एअरफील्डवर हे विमान उड्डाण करण्याचा प्रयत्न करत असताना कोसळले. आकारमानामुळे देखील हे विमान आज चर्चेचा विषय ठरले होते.
या दुर्घटनेत विमानातील कोणताही क्रू सदस्य जखमी झाला नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. ब्रिटनच्या हायब्रीड एअर व्हेईकल कंपनीने याचं डिझाईन बनवलं होतं. हेलिअम गॅसवर उडणारं हे विमान ताशी 148 किमी वेगाने उडायचं. विशेष म्हणजे या विमानाला उतरवण्यासाठी रनवेची गरज नव्हती.
या विमानाला पाण्यावरही उतरता येत होतं तसंच रिमोटनेही नियंत्रित करता येऊ शकतं होतं. हे विमान बनवण्यासाठी तब्बल 10 वर्षाचा कालावधी लागला आहे. विमानाच्या निर्मितीसाठी 25 दशलक्ष पाऊण्ड म्हणजेच जवळपास 2.5 अब्ज रुपये इतका खर्च झाला. विमानात क्रूसोबत 48 प्रवाशांना घेऊन जाण्याची क्षमता होती. तसंच 10 हजार टन सामानही उचलू शकतं. कोणत्याही प्रवासी जेटपेक्षा याची लांबी 15 मीटर जास्त होती.