पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या मुलीचा विवाह सोहळा सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. २६ डिसेंबर रोजी रावळपिंडी येथील लष्कराच्या जनरल हेडक्वार्टर्समध्ये अत्यंत गुप्तपणे हा निकाह पार पडला. सुरक्षेच्या कारणास्तव या सोहळ्याला कमालीचे गुपित ठेवण्यात आले होते, इतके की या लग्नाचा एकही अधिकृत फोटो अद्याप समोर आलेला नाही.
मुलीचा निकाह सख्ख्या पुतण्याशी!
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जनरल असीम मुनीर यांची तिसरी मुलगी महनूर हिचा निकाह त्यांचे भाऊ कासिम यांचा मुलगा म्हणजेच मुनीर यांचा पुतण्या कॅप्टन अब्दुल रहमान कासिम याच्याशी झाला आहे. अब्दुल रहमान हा पूर्वी पाकिस्तान लष्करात कॅप्टन होता. त्यानंतर त्याने लष्करी कोट्यातून नागरी प्रशासनात प्रवेश केला असून सध्या तो साहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहे.
व्हीव्हीआयपी पाहुण्यांची मांदियाळी
हा सोहळा जरी गुप्त ठेवला असला, तरी पाहुण्यांची यादी मात्र अतिशय तगडी होती. या निकाहला पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी, पंतप्रधान शहबाज शरीफ, उपपंतप्रधान इशाक डार, पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज आणि आयएसआय प्रमुखांसह सुमारे ४०० खास निमंत्रित उपस्थित होते. लग्नाची बातमी लीक होऊ नये म्हणून मीडियाला यापासून पूर्णपणे लांब ठेवण्यात आले होते.
पाकिस्तानी पत्रकाराचा 'तो' व्हिडिओ अन् खळबळ
पाकिस्तानी पत्रकार जाहिद गिशकोरी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत या लग्नाला दुजोरा दिला होता. मात्र, लष्कराचा दबाव किंवा सुरक्षेचे कारण यामुळे काही वेळातच तो व्हिडिओ हटवण्यात आला. यावरून पाकिस्तानात लष्करप्रमुखांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किती गोपनीयता पाळली जाते, याची प्रचिती येते.
युएईच्या राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्याची चर्चा
ज्या दिवशी हा विवाह सोहळा पार पडला, त्याच दिवशी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान हे देखील पाकिस्तान दौऱ्यावर आले होते. ते या लग्नाला उपस्थित राहणार असल्याची चर्चा रंगली होती, मात्र त्यांनी लष्करप्रमुखांशी फक्त चर्चा केली आणि ते शिकारीसाठी रहीम यार खानकडे रवाना झाले.
असीम मुनीर यांना एकूण चार मुली असून, या तिसऱ्या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी लष्करी मुख्यालयाची निवड केल्याने पाकिस्तानातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.