डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा; प्रचारात रशियाचा हस्तक्षेप नसल्याचा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 19:26 IST2019-03-25T19:25:17+5:302019-03-25T19:26:05+5:30
या अहवालात ट्रम्प यांनी रशियाची कोणतीही मदत घेतली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा; प्रचारात रशियाचा हस्तक्षेप नसल्याचा अहवाल
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाची मदत घेत निवडणूक जिंकल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करणारे विशेष महाधिवक्ता रॉबर्ट मुलर यांनी सरकारला दिलेल्या अहवालात ट्रम्प यांना क्लीन चीट दिली आहे. 2016 मध्ये झालेल्या अमेरिकी सिनेटच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी प्रचारासाठी रशियाशी हातमिळवणी करत निवडणूक जिंकल्याचा आरोप झाला होता.
या अहवालात ट्रम्प यांनी रशियाची कोणतीही मदत घेतली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे, असे अमेरिकेचे महाधिवक्ता बिलियम बर्र यांनी सांगितले. अमेरिकी संसदेमध्ये हा अहवाल रविवारी मांडण्यात आला होता. या अहवालामुळे ट्रम्प यांना मोठा दिलासा मिळाला असून पुढील निवडणुकीत याचा फायदा होणार आहे.
मुलर यांनी संसदेला लिहिलेल्या चार पानांच्या पत्रात म्हटले आहे की, तपासामध्ये ट्रम्प यांनी रशियासोबत मिळून प्रचार केल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. 2016 मध्ये अमेरिकेच्या निवडणुकांना रशियाने प्रभावित केल्याचेही कुठे आढळले नाही. बर्र यांनी हेही सांगितले आहे की, ट्रम्प यांनी कोणता गुव्हा केला असेही यामध्ये देण्यात आलेले नाही. हा अहवाल त्यांना दोषमुक्त करणारा नाही, मात्र ट्रम्प-रशियाचे संबंधही स्पष्ट होत नसल्याचे बर्र यांनी सांगितले.