युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 13:42 IST2025-10-31T13:41:33+5:302025-10-31T13:42:11+5:30
बुडापेस्ट येथे अमेरिका आणि रशियाच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये उच्चस्तरीय बैठक प्रस्तावित होती. मात्र, व्हाइट हाऊसने आता ही बैठक अचानक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पुढील महिन्यात हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे अमेरिका आणि रशियाच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये उच्चस्तरीय बैठक प्रस्तावित होती. मात्र, व्हाइट हाऊसने आता ही बैठक अचानक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाने बैठकीसाठी अवाजवी मागण्या केल्यामुळे अमेरिकेने हा निर्णय घेतला असल्याचे वृत्त रॉयटर्सने फायनान्शियल टाईम्सच्या हवाल्याने दिले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात नियोजित असलेली ही भेट तणाव कमी करण्याच्या आणि शांतता चर्चेच्या दिशेने पहिले महत्त्वाचे पाऊल ठरू शकते, अशी आशा सगळ्यांनाच होती. मात्र, रशियाने औपचारिक मेमोद्वारे पाठवलेल्या अटी अमेरिकेच्या दृष्टीने अस्वीकार्य ठरल्या. परिणामी, दोन्ही देशांमधील संबंधांमधील तणाव आता अधिकच वाढला आहे आणि संभाव्य शांतता चर्चांवर संशयाचे ढग दाटले आहेत.
रशियाच्या अटींनी वाढवले अंतर!
'फायनान्शियल टाईम्स'च्या अहवालानुसार, रशियाने आपल्या प्रस्तावात अमेरिकेकडून दोन अत्यंत महत्त्वाच्या आणि वादग्रस्त मागण्या केल्या होत्या. त्यातील एक म्हणजे रशियावर लादलेले सर्व कठोर आर्थिक आणि इतर निर्बंध त्वरित हटवावेत. तर, दुसरी अट अशी होती की, रशियाने युक्रेनमध्ये बळकावलेल्या सर्व प्रदेशांवरील दाव्यांना अमेरिकेने अधिकृतपणे मान्यता द्यावी.
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी या मागण्यांना अस्वीकार्य ठरवत, बैठक रद्द करण्याचा निर्णय घेतला. सध्या व्हाइट हाऊसने यावर कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही, परंतु या आठवड्याच्या सुरुवातीला एका प्रशासकीय अधिकाऱ्याने सध्याच्या काळात ट्रम्प आणि पुतिन यांच्यात कोणतीही भेट नियोजित नाही, असे संकेत दिले होते.
ट्रम्प यांची हताशा आणि बदलता सूर
ही बैठक रद्द होण्यामागे ट्रम्प यांचा बदललेला सूरही महत्त्वाचा मानला जात आहे. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी पुतिन यांच्याबद्दल हताश वाटत असल्याची कबुली दिली. सत्ता मिळाल्यावर एका दिवसात युद्ध संपवेन असा दावा त्यांनी यापूर्वी केला होता आणि पुतिन यांच्यासोबत व्यक्तिगत समजूत असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, आता त्यांनीही पुतिनसोबत उच्चस्तरीय बैठक शक्य नसल्याचे मान्य केले आहे.
गेल्या आठवड्यात, फ्लोरिडामध्ये अमेरिकेचे अधिकारी आणि एका वरिष्ठ रशियन प्रतिनिधीमध्ये चर्चा झाली होती, मात्र त्या बैठकीनंतर ट्रम्प यांनी 'मला माझा वेळ वाया घालवायचा नाही' असे स्पष्ट संकेत दिले होते.
शांततेच्या प्रयत्नांना मोठा धक्का
विश्लेषकांचे मत आहे की, या घडामोडीमुळे वॉशिंग्टन आणि मॉस्कोमधील तणावपूर्ण संबंधांना आणखीनच खोलवर धक्का बसला आहे. दोन्ही देशांमध्ये विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्याचे प्रयत्न आधीच थांबले आहेत. अशा परिस्थितीत ही बैठक रद्द झाल्यामुळे कोणत्याही संभाव्य शांतता वाटाघाटीच्या आशा मावळल्या आहेत. अमेरिका आणि रशियामधील मतभेद आता पूर्वीपेक्षा अधिक तीव्र दिसत आहेत.