Biden Vice president pick Kamala Harris chosen as running mate | भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार; डेमोक्रॅटिक पक्षाकडून नावाची घोषणा

भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार; डेमोक्रॅटिक पक्षाकडून नावाची घोषणा

वॉशिंग्टन: भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या नावाची घोषणा अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून करण्यात आली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांनी हॅरिस यांच्या नावाची घोषणा केली. याआधी अमेरिकेला कधीही कृष्णवर्णीय उपाध्यक्ष लाभलेला नाही. त्यामुळे हॅरिस निवडून आल्यास अमेरिकन निवडणुकीत इतिहास रचला जाईल. 

कमला हॅरिस डेमोक्रॅटिक पक्षाकडून उपाध्यक्षपदाच्या उमेदवार असतील, अशी घोषणा जो बिडेन यांनी केली. त्यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. 'उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून हॅरिस यांचं नाव घोषित करताना अतिशय अभिमान वाटतो. हॅरिस निर्भीड आहेत. त्या देशातल्या सर्वोत्तम लोकप्रतिनिधींपैकी एक आहेत,' असं बिडेन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.



'माझा दिवंगत मुलगा ब्युसोबत हॅरिस यांनी काम केलं आहे. त्यावेळी त्या कॅलिफॉर्नियाच्या ऍटॉर्नी जनरल होत्या. कर्मचारी वर्गाच्या राहणीमानात सुधारणा व्हावी, महिला आणि बालकांच्या हक्कांचं संरक्षण व्हावं, त्यांच्याविरोधातले गुन्हे रोखले जावेत, यासाठी हॅरिस आणि माझ्या मुलानं काम केलं होतं,' अशा शब्दांत बिडेन यांनी भूतकाळातील आठवण सांगितली. मला त्यावेळीही हॅरिस यांचा अभिमान होता आणि आजही आहे, असं बिडेन यांनी पुढे म्हटलं. 



कॅलिफॉर्नियाच्या खासदार असलेल्या कमला हॅरिस आधी अध्यक्षपदाच्या शर्यतीत होत्या. मात्र नंतर त्यांचं नाव मागे पडलं. डेमोक्रॅटिक पक्षानं जो बिडेन यांच्या नावाला अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून पसंती दिली. यानंतर आता हॅरिस यांची निवड उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून करण्यात आली आहे. हॅरिस यांनी याआधी कॅलिफॉर्नियाच्या ऍटॉर्नी जनरल म्हणून काम केलं आहे. पोलीस कारवाईत कृष्णवर्यीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत आंदोलनं सुरू झाली. त्यावेळी हॅरिस यांनी पोलीस दलातील सुधारणांचा मुद्दा उपस्थित केला होता. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत हॅरिस यांच्यासमोर रिपब्लिकन पक्षाच्या माईक पेन्स यांचं आव्हान असेल. पेन्स सध्या अमेरिकेचे उपाध्यक्ष म्हणूनच काम करत आहेत. 

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Biden Vice president pick Kamala Harris chosen as running mate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.