‘इसीस’कडून ब्रिटिश नागरिकाचा शिरच्छेद
By Admin | Updated: September 15, 2014 04:32 IST2014-09-15T04:32:17+5:302014-09-15T04:32:17+5:30
इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅण्ड सिरियाच्या (इसीस) दहशतवाद्यांनी ब्रिटनच्या मदत पथकातील कार्यकर्त्याचा शिरच्छेद केला असून पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी रविवारी हे कृत्य ‘निव्वळ दुष्ट’ असल्याचे म्हटले

‘इसीस’कडून ब्रिटिश नागरिकाचा शिरच्छेद
लंडन : इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅण्ड सिरियाच्या (इसीस) दहशतवाद्यांनी ब्रिटनच्या मदत पथकातील कार्यकर्त्याचा शिरच्छेद केला असून पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी रविवारी हे कृत्य ‘निव्वळ दुष्ट’ असल्याचे म्हटले. डेव्हिड हैनिस (४४) यांचा दहशतवादी शिरच्छेद करीत असल्याचा व्हिडिओ इस्लामिक स्टेटने जारी केल्यानंतर कॅमेरून यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
हा व्हिडिओ खराच असल्याची खातरजमा ब्रिटन करीत असून कॅमेरून यांनी मारेकऱ्यांना पकडण्यासाठी सर्व काही केले जाईल, असे सांगितले. ही हत्या झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिका इंग्लंडच्या खांद्याला खांदा लावून काम करील, असे सांगितले. हैनिस यांना २०१३ मध्ये सिरियात इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी ताब्यात घेतले होते. आयएसच्या दहशतवाद्यांनी या आधीच अमेरिकेच्या दोन पत्रकारांचा शिरच्छेद केलेला आहे. हैनिस यांच्या शिरच्छेदाच्या व्हिडिओमध्येही दहशतवाद्यांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या आणखी एका ब्रिटिशाची हत्या करण्याची धमकी दिली आहे. हैनिस यांचा चेहरा झाकलेल्या मारेकऱ्याकडून शिरच्छेद होत असलेल्या या २ मिनिटे व २७ सेकंदांच्या व्हिडिओचा मथळा ‘अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांना संदेश’ असा आहे. इस्लामिक स्टेटला नष्ट करण्यासाठी अमेरिकेने सुरू केलेल्या प्रयत्नांत ब्रिटनची साथ आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी कितीही वेळ लागला तरी आम्ही पकडू, असे कॅमेरून म्हणाले. हैनिस यांच्या कुटुंबियांनी त्यांची नेहमीच उणीव भासेल, असे म्हटले. आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबोट यांनी विशिष्ट दहशतवादी गट केवळ वाईट कृत्यच करतो असे नाही तर ते करताना आनंदही घेतो, असे म्हटले. इसीसने इराकचे ५ ते ६ दशलक्ष लोकसंख्येचा भूभाग ताब्यात घेतला आहे. (वृत्तसंस्था)