बँक ऑफ जपानकडून वृद्धिदर घटण्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 08:53 IST2025-04-08T08:53:08+5:302025-04-08T08:53:21+5:30
जपानी अर्थव्यवस्थेतील सुधारणा धोक्यात येण्याची भीती आहे.

बँक ऑफ जपानकडून वृद्धिदर घटण्याचा इशारा
टोकियो : पुढे आणखी मोठे संकट आहे, असा इशारा बँक ऑफ जपानने जपानी अर्थव्यवस्थेसाठी जारी केला आहे. अमेरिकी टॅरिफनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा इशारा महत्त्वपूर्ण आहे.
विश्लेषकांच्या मते, अमेरिकी करांमुळे जपानचा अर्थिक वृद्धीचा दर ०.८ टक्क्यांपर्यंत घटू शकते. बँकेने जारी केलेल्या निवेदनात अमेरिकी टॅरिफचा स्पष्टपणे उल्लेख मात्र केलेला नाही. बँकेने म्हटले की, काही कंपन्यांचे उत्पादन व नफा याबाबत चिंता करण्याजोगी स्थिती आहे. जपानी अर्थव्यवस्थेसाठी अनिश्चितता वाढत आहे. जपानी अर्थव्यवस्थेतील सुधारणा धोक्यात येण्याची भीती आहे. बँक ऑफ जपानने आपल्या सर्व ९ क्षेत्रांसदर्भात म्हटले की, अर्थव्यवस्था एक तर सुधारत आहे किंवा मध्यम गतीने वाढत आहे.
खर्च ग्राहकांच्या माथी
बँक ऑफ जपानच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा अहवाल अमेरिकेच्या समतूल्य आयात कराचा परिणाम पूर्णांशाने दर्शविणारा नाही. विदेशी पर्यटकांच्या मजबूत खरेदीमुळे तसेच चैनीच्या वस्तूंच्या वाढलेल्या मागणीमुळे विक्रीला बळ मिळाले आहे. कंपन्या कॅपेक्स करण्यास तयार आहेत. अनेक क्षेत्रांत वेतन वृद्धी होत आहे. काही छोटे व्यवसाय वेतन वाढीबाबत सतर्क आहेत. कंपन्या हळूहळू आयात खर्च ग्राहकांच्या माथी मारत आहेत. काही तर किमती वाढविण्याच्या योजनाही बनवत आहेत.
वॉशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा जगभरातील क्रिप्टो चलनांना मोठा फटका बसला आहे. बाजार भांडवलाच्या दृष्टीने जगात मोठे असलेले क्रिप्टो चलन बिटकॉईन उच्चांकापासून २९ टक्के घसरून ७७ हजार डॉलरवर आले आहे.
अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी क्रिप्टो चलनास समर्थन दिले होते. ते राष्ट्रपती होताच बिटकॉईन प्रचंड तेजीत येऊन १ लाख डॉलरच्या वर गेले होते. आता टॅरिफ धोरणामुळे बिटकॉईन आपटले आहे. नोव्हेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत बिटकॉईन रॉकेटच्या गतीने वाढले होते.
पाकिस्तानचा शेअर बाजार ८ हजार अंकांनी कोसळला
कराची : मंदीच्या भीतीने जगभरातील शेअर बाजारांत घसरण होत असताना पाकिस्तानही त्यातून सुटला नाही. पाकिस्तानचा शेअर बाजार पीएसएक्समध्ये सोमवारी ८ हजार अंकांची मोठी घसरण झाली होती. त्यामुळे बाजारातील व्यवहार तासाभरासाठी थांबविण्यात आले होते. आर्थिक विश्लेषकांनी या तीव्र घसरणीसाठी जागतिक मंदीच्या भीतीला जबाबदार धरले.