बांगलादेशी सैन्याने डोळे वटारले; मोहम्मद युनूस यांच्या गोटात पळापळ, राजीनामा देण्यास तयार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 08:59 IST2025-05-23T08:57:13+5:302025-05-23T08:59:27+5:30
बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारचे प्रमुख प्रोफेसर मुहम्मद युनूस यांनी आता राजीनाम्याची तयारी दाखवली आहे. सध्याच्या राजकीय संकटामुळे आणि पक्षांमध्ये एकमत नसल्यामुळे ते राजीनामा देण्याचा विचार करत आहेत.

बांगलादेशी सैन्याने डोळे वटारले; मोहम्मद युनूस यांच्या गोटात पळापळ, राजीनामा देण्यास तयार
बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारचे प्रमुख प्रोफेसर मोहम्मद युनूस यांनी आता राजीनाम्याची तयारी दाखवली आहे. सध्याच्या राजकीय संकटामुळे आणि पक्षांमध्ये एकमत नसल्यामुळे ते राजीनामा देण्याचा विचार करत आहेत. नॅशनल सिटिझन पार्टी प्रमुख नाहिद इस्लाम यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ही माहिती दिली. नाहिद इस्लाम म्हणाले, दिवसभर युनूस यांच्या राजीनाम्याची चर्चा होती. गुरुवारी युनूस यांना भेटायला गेले होते. "सर म्हणाले की ते याबद्दल विचार करत आहेत. त्यांना वाटते की सध्याच्या परिस्थितीत काम करणे शक्य नाही. जोपर्यंत सर्व राजकीय पक्ष एकमत होत नाहीत तोपर्यंत ते काम करू शकणार नाहीत, असंही नाहिद इस्लाम म्हणाले.
प्रो. देशात सुरू असलेल्या राजकीय गतिरोधामुळे आणि पक्षांमधील संवादाच्या अभावामुळे त्यांचे सरकार प्रभावीपणे काम करू शकत नाही याबाबत युनूस यांनी चिंता व्यक्त केली. जर त्यांना राजकीय पाठिंबा आणि आत्मविश्वास मिळाला नाही तर त्यांच्या पदावर राहण्यात काही अर्थ नाही, असे त्यांनी सूचित केले.
याबाबत नाहिद इस्लाम यांनी त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जनआंदोलनाची सुरक्षा, भविष्य आणि अपेक्षा लक्षात घेऊन ठाम राहिले पाहिजे हे त्यांनी युनूस यांना सांगितले. ते म्हणाले, "मी त्यांना सांगितले की देशाला तुमची गरज आहे. मला आशा आहे की राजकीय पक्ष अखेर एकत्र येतील आणि तुम्हाला पाठिंबा देतील."
'अंतरिम सरकारला या वर्षी डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय निवडणुका घ्याव्या लागतील
काही दिवसापासून युनूसच्या सरकारला अनेक गंभीर आव्हानांचा सामना करावा लागला आहे. देशाच्या लष्करासोबत त्यांना सामना करावा लागला आहे. बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांनी अखेर अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांना लवकर निवडणुका घ्याव्यात, लष्करी बाबींमध्ये हस्तक्षेप करणे थांबवावे आणि प्रस्तावित राखीन कॉरिडॉरसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लष्कराला माहिती द्यावी असा कडक संदेश दिला आहे. 'अंतरिम सरकारला या वर्षी डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय निवडणुका घ्याव्या लागतील, अशी घोषणा बुधवारी ढाक्याच्या सेनाप्रांगन येथे जनरल वॉकर यांनी केली.