बांगलादेशच्या नोटांवरून हटवला शेख हसीना यांच्या वडिलांचा फोटो, आता देशाच्या चलनावर दिसणार मंदिरे! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:56 IST2025-06-02T13:49:26+5:302025-06-02T13:56:43+5:30

बांगलादेशने १ जूनपासून नवीन बँक नोटा अधिकृतपणे जारी करण्यास सुरुवात केली असून, या नव्या नोटांवरून देशाचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो हटवला आहे.

Bangladesh removes Sheikh Hasina's father's photo from banknotes, now temples will appear on the country's currency! | बांगलादेशच्या नोटांवरून हटवला शेख हसीना यांच्या वडिलांचा फोटो, आता देशाच्या चलनावर दिसणार मंदिरे! 

बांगलादेशच्या नोटांवरून हटवला शेख हसीना यांच्या वडिलांचा फोटो, आता देशाच्या चलनावर दिसणार मंदिरे! 

बांगलादेशने १ जूनपासून नवीन बँक नोटा अधिकृतपणे जारी करण्यास सुरुवात केली असून, या नव्या नोटांवरून देशाचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान अर्थात शेख हसीना यांच्या वडिलांचा फोटो हटवण्यात आला आहे. त्याऐवजी, बौद्ध, हिंदू मंदिरं, ऐतिहासिक स्मारकं आणि कलाकृती यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिमा वापरण्यात आल्या आहेत.

बांगलादेश बँकेचे प्रवक्ते आरिफ हुसेन खान यांनी 'एएएफपी' वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “नवीन नोटा देशाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारशाचे दर्शन घडवतील. यामध्ये मानवी प्रतिमांऐवजी वास्तुशिल्प, निसर्गदृश्ये आणि ऐतिहासिक स्मृतीस्थळे अधिक ठळक असतील.”

या नोटांमध्ये बौद्ध आणि हिंदू मंदिरांची चित्रं, प्रसिद्ध चित्रकार जैनुल आबेदीन यांची कलाकृती, तसेच राष्ट्रीय शहीद स्मारकाचा समावेश करण्यात आला आहे. या डिझाईनचा उद्देश १९७१ च्या मुक्तिसंग्रामातील बलिदानांची आठवण करून देणे हा आहे. नवीन चलन बांगलादेश बँकेच्या मुख्यालयातून टप्प्याटप्प्याने देशभर वितरित करण्यात येणार आहे.

राजकीय पार्श्वभूमीमुळे बदल?
या चलन बदलाला राजकीय पार्श्वभूमी असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे. शेख मुजीबुर रहमान हे माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे वडील आहेत. जानेवारी २०२५मध्ये बांगलादेशात सत्तांतर झाल्यानंतर शेख हसीनांना देश सोडावा लागला आणि त्यांनी भारतात आश्रय घेतला. त्यानंतर, देशात अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले असून नोबेल पुरस्कार विजेते डॉ. मोहम्मद युनूस यांनी त्याचे नेतृत्व स्वीकारले आहे.

चलनबदलाचा इतिहास 
बांगलादेशने राजकीय बदलांनंतर चलनात मोठा बदल करण्याची ही पहिली वेळ नाही. १९७२ मध्ये देशाने स्वतंत्रता प्राप्त केल्यानंतर प्रथम आपल्या नोटांवर नकाशा छापला होता. नंतरच्या काळात शेख मुजीब यांचे फोटो जवळपास सर्वच नोटांवर दिसू लागले. शेख हसीना यांच्या कारकिर्दीत त्यांच्या वडिलांचा फोटो चलनावर कायम होता.

Web Title: Bangladesh removes Sheikh Hasina's father's photo from banknotes, now temples will appear on the country's currency!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.