अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 09:02 IST2025-12-12T09:00:43+5:302025-12-12T09:02:20+5:30
Mohammad Shahabuddin: बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या सरकारकडून वारंवार अपमानित केले जात असल्याचा आरोप केला आहे.

अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या संसदीय निवडणुकीनंतर आपल्या कार्यकाळाच्या मध्यभागी पद सोडण्याचा विचार असल्याचे गुरुवारी रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारकडून त्यांना वारंवार अपमानित केले जात असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.
२०२३ मध्ये अवामी लीगचे उमेदवार म्हणून पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी बिनविरोध निवडून आलेले शहाबुद्दीन हे बांगलादेश सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर आहेत. ऑगस्ट २०२४ मध्ये विद्यार्थ्यांच्या निषेधामुळे माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला. त्यानंतर मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या देशाची जबाबदारी सोपवण्यात आली. परंतु, अवामी लीगला १२ फेब्रुवारीच्या निवडणुकीत भाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे. शहाबुद्दीन यांनी आता त्यांना राष्ट्रपती पदावर राहायचे नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. निवडणुकीनंतर लगेच पद सोडण्याची त्यांची इच्छा आहे. परंतु सध्या ते केवळ संवैधानिक जबाबदारी म्हणून पदावर असल्याचे त्यांनी नमूद केले.
युनूस यांच्यावर गंभीर आरोप
शहाबुद्दीन यांनी अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यांना पूर्णपणे बाजूला केले असून, जवळजवळ सात महिन्यांपासून युनूस त्यांच्याशी भेटले नाहीत, असे त्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त, त्यांचा प्रेस विभाग काढून टाकण्यात आला आणि सप्टेंबरमध्ये जगभरातील बांगलादेशी दूतावास आणि मिशनमधून त्यांचा फोटो काढून टाकण्यात आला, यामुळे त्यांना अपमान वाटला, असे शहाबुद्दीन म्हणाले.
"माझा आवाज बंद करण्यात आला"
"सर्व दूतावास, उच्चायोग आणि वाणिज्य दूतावासांमध्ये राष्ट्रपतींचा फोटो लावला जात असे. परंतु, तो रात्रीतून काढून टाकण्यात आला. यामुळे कदाचित राष्ट्रपतींनाच पदावरून हटवण्यात आले आहे, असा जनतेला चुकीचा संदेश जात." त्यांनी युनूस यांना फोटो काढण्याबाबत पत्र लिहूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगत 'माझा आवाज बंद करण्यात आला आहे', अशी खंत व्यक्त केली.