"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 17:43 IST2025-12-20T17:40:55+5:302025-12-20T17:43:10+5:30
Osman Hadi Funeral: हादी यांच्या अंत्यसंस्कारासाठी लाखो लोक जमले होते

"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Osman Hadi Funeral: बांगलादेशातील एक प्रमुख विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. हादी यांच्या अंत्यसंस्कारासाठी लाखो लोक जमले होते. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस हे देखील हादी यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते. युनूस यांनी हादी यांना अंतिम निरोप देताना त्यांचे वर्णन एक नायक म्हणून केले. ते म्हणाले, "आज संपूर्ण देशाला त्यांची आठवण येतेय. त्यांनी बांगलादेशसाठी जे केले ते लक्षात ठेवले जाईल."
विद्यार्थी नेता हादी यांना गोळी झाडून ठार करण्यात आली. त्यानंतर त्यांना सिंगापूरमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले. अथक उपचारानंतरही हादी यांना वाचवता आले नाही. १८ डिसेंबरला त्यांचे निधन झाले. हादी यांच्या मृत्यूमुळे बांगलादेशात गोंधळ उडाला. लोक रस्त्यावर उतरले आणि घोषणाबाजी केली. अनेक भागात आगही लावण्यात आली. संतप्त जमावाने देशातील माध्यमांच्या कार्यालयावरही हल्ले केले.
जोपर्यंत बांगलादेश अस्तित्वात आहे, तोपर्यंत...
शनिवारी बांगलादेशात हादीला दफन करण्यात आले. मोहम्मद युनूस यांनी याप्रसंगी श्रद्धांजली वाहिली. हादीचे स्मरण करताना युनूस म्हणाले, "हादी यांचे विचार कुठेही जाणार नाहीत; त्यांनी मागे सोडलेले मंत्र आपल्या कानात सतत घुमत राहतील. आज लाखो लोक आले आहेत. लोक मोठ्या संख्येने जमत आहेत. या क्षणी, लाखो लोकांच्या नजरा येथे आहेत. त्यांना हादीबद्दल जाणून घ्यायचे आहे. प्रिय उस्मान हादी, आम्ही तुम्हाला निरोप देण्यासाठी आलो नाही. तुम्ही आमच्या हृदयात आहात. जोपर्यंत बांगलादेश अस्तित्वात आहे, तोपर्यंत तुम्ही सर्व बांगलादेशींच्या हृदयात राहाल. तुमच्या आठवणी कुणीही पुसून टाकू शकत नाही."
हादींचे कार्य आपण पूर्ण करूया...
"हादी यांनी जे सांगितले आहे ते आपण पूर्ण करूया. आम्ही हे वचन देण्यासाठी एकत्र आलो आहोत. फक्त आम्हीच नाही तर देशातील सर्व लोक पिढ्यानपिढ्या ते वचन पूर्ण करत राहतील. प्रत्येकजण तुमच्या मानवतेवरील प्रेमाचे, तुमच्या शिष्टाचारांचे, तुमच्या चढ-उतारांचे आणि तुमच्या राजकीय विचारांचे कौतुक करत आहेत. त्याचे विचार आमच्या मनात नेहमीच राहतील," असेही ते म्हणाले.