बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 18:50 IST2025-12-11T18:48:15+5:302025-12-11T18:50:19+5:30
Bangladesh Election Schedule: शेख हसीना यांच्या आवामी लीग पक्षाला निवडणूक लढवता येणार नाही.

बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
Bangladesh Election Schedule: बांग्लादेशात अखेर संसदीय निवडणुकांची घोषणा झाली आहे. आगामी 12 फेब्रुवारी 2026 रोजी 13 वी निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. 5 ऑगस्ट 2024 रोजी बांग्लादेशात झालेल्या तीव्र आंदोलनांनंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले होते.
अवामी लीग निवडणुकीबाहेर
दरम्यान, शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षावर आधीच बंदी लागू असल्यामुळे पक्षाला निवडणूक लढवता येणार नाही. महत्वाचे म्हणजे, या निवडणुकीसोबतच(12 फेब्रुवारी 2026 रोजी) देशात जुलै चार्टर लागू करण्यासाठी जनमत घेतले जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ए.एम.एम. नासिर उद्दीन यांनी आज(दि.11) याबाबत घोषणा केली. जुलै चार्टर हा संवैधानिक सुधारणा आणि शासन व्यवस्थेतील बदल सुचवणारा दस्तऐवज असून, त्याची अंमलबजावणी करायची की नाही, यावर जनमत घेतले जाणार आहे.
56 राजकीय पक्ष मैदानात
या निवडणुकीत 56 पक्ष सहभागी होणार आहेत. तज्ज्ञांच्या मते, मुख्य लढत BNP (बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी), जमात-ए-इस्लामी आणि नवगठित NCP (नॅशनल सिटिझन पार्टी) यांच्यात होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगानुसार, या वेळी 12.8 कोटी मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये 6.42 कोटी पुरुष मतदार आणि 6.28 कोटी महिला मतदार असतील. बांग्लादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.