उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 09:04 IST2025-12-19T08:47:27+5:302025-12-19T09:04:12+5:30
निवडणुकीपूर्वी बांगलादेशात पुन्हा एकदा जाळपोळ सुरू झाली आहे. जुलै चळवळीचे नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेश पेटला आहे. या हिंसाचारात भारताला लक्ष्य केले जात आहे. बांगलादेशातील चार भारतीय राजनैतिक तळ बंद करण्यात आले आहेत.

उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
बांगलादेशात पुन्हा एकदा जाळपोळ सुरू झाली आहे. अनेक शहरांमध्ये हिंसाचार सुरू आहे, मध्यरात्रीपासून शहरांमध्ये जाळपोळ, लूटमार आणि हिंसाचार सुरू आहे. दंगलखोर भारतीय कार्यालयांना लक्ष्य करत आहेत. चितगावमधील भारतीय उच्चायुक्तालयावर दगडफेक करण्यात आली आहे. निदर्शकांनी भारतविरोधी घोषणाबाजी केली आहे. अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना खुलेआम खुनाच्या धमक्या दिल्या जात आहेत.
बांगलादेशातील चार शहरांमध्ये ढाका, राजशाही, खुलना आणि चितगाव येथे भारतीय उच्चायुक्तालयातील व्हिसा प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. २०२४ च्या शेख हसीना यांच्या विरोधातील चळवळीतील प्रमुख असलेल्या कार्यकर्ते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशात मध्यरात्री निदर्शने सुरू झाली. हादी भारताकडे शत्रुत्वाने पाहत होते, त्यांनी वारंवार भारताविरेोधात विधाने केली आहेत.
उस्मान हादी यांच्यावर १२ तारखेला हल्ला झाला
शरीफ उस्मान हादी यांना बांगलादेशमध्ये ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ढाका-८ मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. १२ डिसेंबर रोजी ढाका येथील पलटन परिसरात बॅटरीवर चालणाऱ्या ऑटोरिक्षात हादी यांच्यावर गोळीबार झाला. त्यांना आधी ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले. नंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने एव्हरकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या शनिवारी त्यांना चांगल्या उपचारांसाठी एअरलिफ्ट करून सिंगापूरला नेण्यात आले.
हादी यांचा मृत्यू झाला. आता हादी यांचे समर्थक भारताविरोधात घोषणा देत आहेत. गुरुवारी रात्री ९:४० वाजता एका पोस्टमध्ये, इन्कलाब मंचने शरीफ उस्मान हादीच्या मृत्यूची घोषणा केली "भारतीय वर्चस्वाविरुद्धच्या संघर्षात देवाने महान क्रांतिकारी उस्मान हादी यांना शहीद म्हणून स्वीकारले आहे.", असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे. शरीफ उस्मान हादी हे इन्कलाब मंचचे प्रवक्ते आणि या संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते.