Plane Crash: बांग्लादेशात एक मोठी घटना घडली आहे. आज(सोमवार) दुपारी राजधानी ढाका येथे बांग्लादेश हवाई दलाचे FT-7BGI लढाऊ विमान कोसळले. बांग्लादेशच्या उत्तर भागात ही दुर्घटना घडली. उड्डाणानंतर काही वेळातच विमान एका महाविद्यालयाच्या इमारतीवर कोसळले. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला असून, काही विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बांग्लादेशी माध्यमांनुसार, हवाई दलाचे FT-7BGI प्रशिक्षण विमानाने दुपारी १:०६ वाजता उड्डाण केले आणि दुपारी १:३० वाजता माइलस्टोन कॉलेज कॅम्पसमध्ये कोसळले. अपघाताच्या वेळी विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित होते, त्यामुळे काही विद्यार्थी जखमी अथवा मृत होण्याचा संशय व्यक्त होत आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात अपघातानंतर विद्यार्थी इकडे-तिकडे धावताना दिसत आहेत.
हजरत शाहजहां आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अपघाताची पुष्टी केली आहे. हा अपघात कसा झाला, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. अपघातग्रस्त लढाऊ विमान चीनने बनवले असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.