बलुच बंडखोरांनी जाफर एक्सप्रेसमधील प्रत्येक प्रवाशांचे आयकार्ड तपासले, अन् नंतर हल्ला केला; नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 12:16 IST2025-03-12T12:16:09+5:302025-03-12T12:16:34+5:30
बलुच बंडखोरांनी काल जाफर एक्सप्रेस ट्रेनला ओलीस ठेवले. पाकिस्तान प्रशासनाला त्यांची सुटका करण्यास अजूनही यश आलेले नाही.

बलुच बंडखोरांनी जाफर एक्सप्रेसमधील प्रत्येक प्रवाशांचे आयकार्ड तपासले, अन् नंतर हल्ला केला; नेमकं कारण काय?
पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात मंगळवारी बलुचिस्तान फुटीरवाद्यांनी जाफर एक्सप्रेस ट्रेनला ओलीस ठेवले. जवळपास २४ तास उलटून गेले आहेत, पण आतापर्यंत पाकिस्तानी सुरक्षा दलांना ट्रेन मुक्त करण्यात अपयश आले आहे. दरम्यान, बलुच बंडखोरांनी ट्रेनमध्ये अनेक नागरिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना ठार मारले आहे. हा हल्ला बंडखोरांनी रॉकेट लाँचर, बंदुका आणि बॉम्ब वापरून केला.
हल्लेखोरांनी आधी ट्रेन चालकावर हल्ला केला आणि त्याला खाली फेकल्यानंतर त्यांनी ट्रेनचा ताबा घेतला. या घटनेत आतापर्यंत डझनभराहून अधिक पाकिस्तानी सुरक्षा कर्मचारी ठार झाल्याचे वृत्त आहे. बंडखोरांनी पंजाबी वंशाच्या लोकांना लक्ष्य केले असल्याची माहिती समोर आली आहे.
बलुच बंडखोरांच्या कैदेतून सुटलेल्या लोकांनी घटनाक्रम सांगितला आहे. सुटका झाल्यानंतर जवळच्या रेल्वे स्थानकावर अनेक किलोमीटर चालत गेलेल्या अल्लाहदित्ता या व्यक्तीने सांगितले की, बंडखोरांनी ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांचे ओळखपत्र तपासले. 'आम्ही डोंगरांमधून बराच अंतर कापून येथे पोहोचलो आहोत. मी सकाळपासून उपवास करत आहे आणि अजून तो सोडू शकलो नाही. याचे कारण म्हणजे मला जेवण्याची संधी मिळाली नाही. दुसऱ्या एका प्रवाशाने सांगितले की, बंडखोर पंजाबी वंशाच्या लोकांना लक्ष्य करत होते. बंडखोरांनी ओळखपत्रे तपासली. त्यांना जाणून घ्यायचे होते की कोण बलुचिस्तानचे आहे आणि कोण बाहेरचे आहे. ते पंजाबी वंशाच्या लोकांना शोधत होता.
दुसऱ्या एका प्रवाशाने सांगितले की, जवळच्या स्टेशनवर पोहोचण्यासाठी त्याला ४ तास चालावे लागले. ते आले आणि ओळखपत्र तपासले.' याशिवाय, सर्व्हिस कार्ड देखील तपासण्यात आले. माझ्या समोरच दोन सैनिकांना गोळ्या घालण्यात आल्या आणि उर्वरित चार जणांना घेऊन गेले. त्या लोकांना कुठे नेण्यात आले हे मला माहित नाही. ओळखपत्र तपासल्यानंतर त्यांना आढळले की ती व्यक्ती पंजाबी आहे आणि त्यांनी त्याला सोबत नेले.
बलुच बंडखोर पंजाबी वंशाच्या लोकांवर नाराज आहेत. ते बऱ्याच काळापासून पंजाबी लोकांची हत्या करत आहेत. गेल्या वर्षाच्या सुरुवातीपासून, अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, यात बलुच बंडखोरांनी पंजाबी लोकांची लक्ष्य हत्या केली आहे. महामार्गांवर बस थांबवून अनेक वेळा पंजाबी लोकांवर हल्ले केले आहेत.