इस्लामाबाद - पाकिस्तानात नव्या दहशतवादी संघटनेच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली आहे. त्याचं नाव हरकत इंकलाब इस्लामी पाकिस्तानी म्हणजे IIP ठेवलं आहे. IIP ने एक व्हिडिओ जारी करत त्यांच्या संघटनेची घोषणा केली. हा व्हिडिओ ऊर्दूसोबत पाश्ता भाषेत आहेत ज्यात IIP ने पाकिस्तानला त्यांचा आखाडा बनवण्याचा इशारा दिला आहे. ही संघटना पाकिस्तानातूनच ऑपरेट होणार असून त्यांच्या टार्गेटवर पाकिस्तानी सैन्य असेल. संपूर्ण पाकिस्तानात शरिया कायदा लागू करून इस्लामी शासन स्थापन करणे हा या संघटनेचा हेतू आहे.
रिपोर्टनुसार, गाजी शहाबुद्दीन असं या IIP दहशतवादी संघटनेच्या नेत्याचे नाव आहे. त्यांनी जारी केलेल्या व्हिडिओत हजारो अत्याधुनिक शस्त्रांसोबत दहशतवादी दाखवले आहेत. त्यात मधोमध उभा राहून गाजी शहाबुद्दीन पाकिस्तानला इशारा देत आहे. गाजी शहाबुद्दीनने त्याच्या संघटनेचं घोषणापत्र आणि टार्गेट याबाबत सांगितले. संघटनेने त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी पाकिस्तानात कार्यरत असणाऱ्या अन्य दहशतवादी संघटनांना मदत करण्याचं आवाहन केले आहे. IIP येणाऱ्या काळात पाकिस्तानात सक्रीय दहशतवादी संघटनांशी हातमिळवणीही करण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानात नवी दहशतवादी संघटना
पाकिस्तानात याआधीच १२ हून अधिक दहशतवादी संघटना सक्रीय आहेत. ज्यातील बहुतांश संघटना भारताविरोधात काम करतात. परंतु काही अशा दहशतवादी संघटनांही बनल्या आहेत ज्यांनी पाकिस्तानी सरकारविरोधात युद्धाची घोषणा केली आहे. ज्यात तहरीक ए तालिबान पाकिस्तान ही कुख्यात संघटना आहे. टीटीपीचा हेतू पाकिस्तानला इस्लामिक राष्ट्र बनवणं आहे. पाकिस्तानात शरिया आधारित कायदा लागू व्हावा यासाठी टीटीपी दहशतवादी संघटना लोकांचं रक्त सांडते. तालिबानने अफगाणिस्तानात जो कायदा लागू केला तसाच पाकिस्तानात लागू व्हावा यासाठी टीटीपी सक्रीय आहे.
दरम्यान, नव्याने बनवण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेत किती दहशतवादी आहेत याची संख्या स्पष्ट नाही. हे कुठल्या दहशतवादी संघटनेतून फुटलेत, त्यांचे पाकिस्तानशी वैर काय हे पुढे आले नाही. या नव्या संघटनेने सोशल मीडियात जो व्हिडिओ जारी केला आहे तो ७ मिनिटांचा आहे. त्यात काही लोक हातात झेंडा घेऊन दिसतात, हा झेंडा अफगाण तालिबानीसारखा आहे. पाकिस्तान आधीच बलूचिस्तान लिबरेशन आर्मी आणि टीटीपी यांच्या दहशतीचा सामना करत आहे त्यातच नव्याने बनलेली दहशतवादी संघटना पाकिस्तानला कितपत नुकसान पोहचवणार हे येणाऱ्या काळात दिसून येईल.