चेहरा नसलेलं बाळ जन्मलं, चमत्कार घडला अन् डॉक्टरांचं भाकीत खोटं ठरलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 18:43 IST2021-10-10T18:41:29+5:302021-10-10T18:43:58+5:30
ब्राझीलच्या (Brazil) बारा डी साओ फ्रांसिस्को येथे विरोटरिया मार्चियोली हिचा जन्म झाला होता. सर्वसामान्य बालकांपेक्षी ही मुलगी वेगळीच होती, चिमुकलीस ना डोळे होते, ना नाक, ना चेहरा. त्यामुळे, या मुलीच्या जन्मानंतर डॉक्टरही हैराण झाले होते.

चेहरा नसलेलं बाळ जन्मलं, चमत्कार घडला अन् डॉक्टरांचं भाकीत खोटं ठरलं
देव तारी त्याला कोण मारी... या म्हणीचा प्रत्यय नुकताच दिसून आला. ब्रासीलिया येथे चेहरा नसलेलं बाळ जन्माला आलं. या बाळाच्या जन्मताच डॉक्टरांनी वैद्यक शास्त्राच्या अनुभवाच्या जोरावर ही चिमुकली वाचवण्याची शक्यता नसल्याचे स्पष्टच सांगितले. त्यामुळे, मुलगी झाल्याचा आनंद साजरा करतानाच दु:खाचा डोंगर कुटुंबीयांवर कोसळला. विटोरिया मार्चियोली (Vittoria Marchioli) असं या मुलीचं नाव असून तिच्यासोबत चमत्कारचं घडला.
ब्राझीलच्या (Brazil) बारा डी साओ फ्रांसिस्को येथे विरोटरिया मार्चियोली हिचा जन्म झाला होता. सर्वसामान्य बालकांपेक्षी ही मुलगी वेगळीच होती, चिमुकलीस ना डोळे होते, ना नाक, ना चेहरा. त्यामुळे, या मुलीच्या जन्मानंतर डॉक्टरही हैराण झाले होते. या मुलीचा जन्म कसा काय होऊ शकतो, असा प्रश्न डॉक्टरांना पडला होता. डॉक्टरांच्या अनुभवानुसार या मुलीचे जगणं अशक्य असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, काही काळापुरतीच ती आपल्यासोबत असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे, कुटुबीयांचा आनंद क्षणात दु:खात बदलला.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ट्रेचर कॉलिन्स सिंड्रोम (Treacher Collins syndrome) मुळे त्या लहानशा मुलीच्या चेहऱ्यावरील 40 हाडांचा विकासच झाला नाही. त्यामुळेच, ती डोळे, नाक आणि चेहऱ्याशिवाय जन्माला आली. डॉक्टरांनी या चिमुकलीच्या जगण्याची आशा नसल्याचे सांगितले. त्यानंतर, कुटुंबीयांनी तिच्या अंत्यसंस्काराची तयारीही सुरू केली. मात्र, चमत्कार झाला अन् डॉक्टरांचा अनुभव फोल ठरला.
डेली मेलच्या वृत्तानुसार, त्या चिमुकलीने मृत्यूवर विजय मिळवला. दोन दिवसांनंतरही मुलगी जिवंत राहिल्यामुळे डॉक्टरांनी स्पेशल टीमकडे तीला पाठवले. त्यानंतर, व्हिटोरियाचे डोळे, नाक, आणि चेहऱ्याची सर्जरी करण्यात आली. त्यानंतर, तिच्यावरील उपचारासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात आले आहे. तिला चेहरा मिळावा यासाठी कठीण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. त्यासाठी, मदतीची मागणी होत आहे. त्या, जन्माच्या दिवसानंतर नुकतेच तिचा 9 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.