मेलबर्न - ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या भीषण आगीत निसर्गाची प्रचंड हानी झाली. कोट्यवधी वन्यप्राणीही या आगीत मृत्युमुखी पडले आहेत. आगीने आतापर्यंत 23 जणांचा बळी घेतला आहे. याशिवाय साधारण 50 कोटी प्राणी अन् पक्षांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये लाखो कांगारू अन् हजारो कोआला प्राण्यांचा समावेश आहे. तर मृत्युमुखी पडलेल्या 23 जणांमध्ये दोन फायर फायटर (अग्निशमन दलाचे जवान) यांचा समावेश आहे. त्यापैकी एक असलेल्या अँड्यू यांच्यावर मंगळवारी अत्यंसस्कार करण्यात आले.
ऑस्ट्रेलियातील आगीत होरपळलेल्या प्राण्यांचे व्हायरल फोटो पाहून अनेकांचे ह्रदय पिघळले. सोशल मीडियावर असे ह्रदयद्रावक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. मात्र, त्यानंतर आणखी एक फोटो तसाच व्हायरल झाला आहे. ऑस्ट्रेलियातील चिमुकलीचा हा फोटो जगभर पसरला. हा फोटो अन् त्यामागची कथा वाचल्यानंतर अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.
शेर्लोट असं या चिमुकलीचं नाव असून तिच्या बाजूलाच शवपेटीमध्ये तिच्या वडिलांचे पार्थिव शरीर आहे. या पार्थिवाजवळच अँड्यू यांचे हेल्मेट ठेवण्यात आलं होतं. मात्र, अँड्यू यांच्या पार्थिवाजवळील हे हेल्मेट उचलून 20 महिन्यांच्या शेर्लोटने स्वत:च्या डोक्यावर ठेवलं. आपल्या वडिलांना काय झालंय हेही तिला कळत नसेल. पण, कदाचित वडिलांचे हेल्मेट डोक्यावर घेण्याची तिची नेहमीची सवय असेल, हे भावनिक चित्र पाहून तेथील वातावरण अधिकच स्तब्ध झालं होतं. अनेकांच्या भावना अनावर झाल्याने त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
दरम्यान, ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या भीषण आगीनं 50 कोटीहून अधिक वन्य जीवांचे प्राण घेतले. ही आग आटोक्यात आणण्याचे अजूनही प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीनं पीडितांना मदत करत आहेत. क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनीही पुनर्वसनासाठी पुढाकार घेतला आहे.