दहशतवाद्यांचा जर्मन वृत्तपत्रावर हल्ला
By Admin | Updated: January 12, 2015 03:45 IST2015-01-12T03:45:28+5:302015-01-12T03:45:28+5:30
फ्रान्समधील व्यंग साप्ताहिक चार्ली हेब्डोने प्रसिद्ध केलेली प्रेषित मोहंमद यांची व्यंगचित्रे पुनर्प्रकाशित करणा-या हॅम्बर्ग येथील जर्मन वृत्तपत्रावर रविवारी सकाळी हल्ला केला

दहशतवाद्यांचा जर्मन वृत्तपत्रावर हल्ला
बर्लिन : फ्रान्समधील व्यंग साप्ताहिक चार्ली हेब्डोने प्रसिद्ध केलेली प्रेषित मोहंमद यांची व्यंगचित्रे पुनर्प्रकाशित करणा-या हॅम्बर्ग येथील जर्मन वृत्तपत्रावर रविवारी सकाळी हल्ला केला. या हल्ल्याशी संबंधित दोन लोकांना अटक करण्यात आली आहे.
हॅम्बर्गर मॉर्गेनपोस्ट हे प्रांतिक वृत्तपत्र असून, त्यात ‘अधिक स्वातंत्र्य हवे’ या मथळ्याखाली चार्ली हेब्डोची व्यंगचित्रे छापण्यात आली होती. अज्ञात लोकांनी रविवारी सकाळी या वृत्तपत्राच्या इमारतीच्या खिडक्यांवर दगड व पेटते बोळे फेकले. त्यामुळे दोन खोल्यांना आग लागली व काही फायली जळाल्या. हा हल्ला झाला तेव्हा संपादक विभागात कोणीही नव्हते. या घटनेत जीवितहानी झालेली नाही. हा हल्ला व्यंगचित्रे प्रसिद्ध करण्याशी संबंधित असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, जर्मनीतील ड्रेसडन शहरात ‘आम्ही चार्ली’ असा फलक घेतलेल्या ३५ हजार लोकांनी मोर्चा काढला. गेल्या आठवड्यात असा मोर्चा काढण्यात आला होता. हे शहर सहिष्णू असल्याचा दावा मोर्चेकऱ्यांनी केला.