पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 08:35 IST2025-12-01T08:23:28+5:302025-12-01T08:35:01+5:30
रविवारी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात सात स्फोट झाले, त्यानंतर फ्रंटियर कॉर्प्सच्या गेटवर आत्मघातकी हल्ला झाला. त्यानंतरच्या कारवाईत तीन हल्लेखोर ठार झाल्याचे वृत्त आहे.

पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये २४ तासांत सात स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. बलुचिस्तानमधील नोकुंडी येथील फ्रंटियर कॉर्प्स मुख्यालयाच्या गेटवर आत्मघातकी हल्ला करण्यात आला. हल्लेखोराने बॉम्बने स्वतःला उडवून दिले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला.
हा हल्ला तहरीक-ए-तालिबानने केला असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. पाकिस्तानच्या निमलष्करी दलांच्या मुख्यालयावर हल्ल्यानंतर केलेल्या कारवाईत तीन हल्लेखोर ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
बलुचिस्तान साउथच्या फ्रंटियर कॉर्प्सच्या माहितीनुसार, मुख्यालयाच्या गेटवर मोठा आवाज ऐकू आला. सुरक्षा दलांनी ताबडतोब कारवाई सुरू केली. किमान सहा हल्लेखोर मुख्यालयात घुसल्याचे वृत्त आले. सर्व दहशतवादी मारले जाईपर्यंत ही कारवाई संपणार नाही, असे सुरक्षा दलांनी सांगितले. सुरक्षा दल प्रत्येक खोलीची कसून तपासणी करत आहेत.
यापूर्वी पेशावरमधील फ्रंटियर कॉर्प्सच्या कंपाऊंडवर आत्मघातकी हल्ला झाला होता, यामध्ये तीन लोक मृत्युमुखी पडले होते. क्वेटा येथील निमलष्करी तळावर झालेल्या कार बॉम्ब स्फोटानेही परिसर हादरला. गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानमध्ये अशा हल्ल्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. बलुचिस्तानमधील साबरमध्ये शेकडो पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनेही अनेक वेळा हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.
क्वेटा हादरले
बलुचिस्तानची राजधानी क्वेटा आणि डेरा मुराद जमाली येथे दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणले. शनिवारी क्वेटा येथील पोलिस चौकीवर हातबॉम्ब फेकण्यात आले. त्यानंतर दहशतवादविरोधी विभागाच्या वाहनाजवळ स्फोट झाला. अतिरेक्यांनी रेल्वे रुळांवर आयईडी पेरले होते आणि ट्रेन क्वेटा स्टेशनवर पोहोचण्याच्या बेतात असताना हा स्फोट झाला. या स्फोटामुळे रुळांचे नुकसान झाले, यामुळे रेल्वे सेवा थांबविण्यात आली. शिवाय, डेरा मुराद जमाली येथे गस्ती पोलिसांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला, तिथे हल्लेखोरांनी हातबॉम्ब फेकले.