ईशान्येवर कब्जा करण्याचा 'नापाक' इरादा, काश्मिरात पाकची मदत...; चीनच्या कारस्थानाबाबत तज्ज्ञांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 20:18 IST2021-12-11T20:17:11+5:302021-12-11T20:18:17+5:30
China : अलीकडच्या काळात शी जिनपिंग हे चीनमध्ये अत्यंत शक्तिशाली झाले आहेत. सत्तेवर त्यांचे पूर्ण नियंत्रण आहे. चीनच्या इतिहासात माओत्से तुंग आणि डेंग यांच्या प्रमाणे अमर होण्याची त्यांची इच्छा आहे.

ईशान्येवर कब्जा करण्याचा 'नापाक' इरादा, काश्मिरात पाकची मदत...; चीनच्या कारस्थानाबाबत तज्ज्ञांचा इशारा
नवी दिल्ली -शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली चीन इंडो-पॅसिफिक क्षेत्रात झपाट्याने विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. भारताचा विचार करता त्यांचा दृष्टिकोन अनेक दशकांपासून आक्रमक आहे. LAC वर बऱ्याच दिवसांपासून तणाव आहे. जिनपिंग यांनी अनेकवेळा चिनी सैन्याला युद्धासाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे.
जागतिक पातळीवर जवळपास प्रत्येक क्षेत्रातच अमेरिकेच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करत असलेला चीन, LAC वर भारतासोबत तणाव का वाढवत आहे? तर, कॅबिनेट सचिवालयात अतिरिक्त सचिव राहिलेले आणि सध्या सेंटर फॉर चायना अॅनालिसिस अँड स्ट्रॅटेजीचे अध्यक्ष असलेले जयदेव रानडे यांनी, यामागे चीनची मोठी चाल असल्याचे म्हटले आहे. चीनची आक्रमकता, ही दुसरे तिसरे काही नसून भारताकडून वाटत असलेल्या भीतीचा परिणाम आहे!
रानडे यांनी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रातून चीनच्या अशा भीतीसंदर्भात भाष्य केले आहे. ज्यावर मात करण्यासाठी, ते LAC वर आक्रमक आहेत. त्यांनी लिहिले आहे की, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात चीनचे लोकप्रिय पोर्टल झिहूवर 72 पानांचा लेखात प्रसिद्ध करण्यात आला होता. हे पोर्टल बिजिंग म्युनिसिपल कम्युनिस्ट पक्षाच्या देखरेखीखाली चालवले जाते.
संबंधित आर्टिकलमध्ये, भारत भविष्यात चीनसाठी 'मोठी समस्या' बनू शकते, असे म्हणण्यात आले आहे. सध्या भारत चीनच्या बराच मागे असला तरी, लोकसंख्या आणि इतर काही गोष्टींमुळे तो काही वर्षांतच चीनला मागे टाकण्यात सक्षम होईल आणि मग चीनवर सूड उगवेल. याच बरोबर, चीनने अक्साई चीन, तसेच संपूर्ण पीओके, बाल्टिस्तान आणि गिलगिटवर कब्जा करायला हवा.
एवढेच नाही, तर लडाखवरही नियंत्रण ठेवायला हवे आणि काश्मीर ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानला मदत करायला हवी. याशिवाय, भारत कधीही चीनसाठी आव्हान बनू नये, म्हणून चीनने ईशान्य भारतातील राज्ये इतर देशांपासून वेगळी करायला हवीत, असा सल्लाही या लेखातून देण्यात आला आहे.
रानडे यांच्या मते, पुढील काही वर्षे खूप महत्त्वाची असणार आहेत. अलीकडच्या काळात शी जिनपिंग हे चीनमध्ये अत्यंत शक्तिशाली झाले आहेत. सत्तेवर त्यांचे पूर्ण नियंत्रण आहे. चीनच्या इतिहासात माओत्से तुंग आणि डेंग यांच्या प्रमाणे अमर होण्याची त्यांची इच्छा आहे. यासाठी ते आक्रमक विस्तारवादी धोरणानेच पुढे जातील.
चीनच्या कुटिल चालींसंदर्भ रानडे म्हणतात, भारतही चीनचा प्रतिकार करण्यासाठी वेगाने प्रयत्न करत आहे. कट्टर राष्ट्रवादी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दादागिरीपुढे झुकणार नाहीत. ते अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आक्रमक चीनचा सामना करत आहेत. त्यासाठी एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर मजबूत आघाड्यांद्वारे चीनची घेराबंदी सुरू आहे. तर दुसरीकडे चीनचे वर्चस्व असलेल्या सप्लाई चेनवरील अवलंबित्व कमी केले जात आहे.