शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
2
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
3
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
4
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
5
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
6
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
7
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
8
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
9
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
10
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
11
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
12
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
13
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
14
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
15
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
16
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
18
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
19
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

जगभर | विशेष लेख : हॅकर्सचा अमेरिकेच्या थेट ट्रेझरीवरच हल्ला; टेलिकॉम कंपन्यांतही घुसखोरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 08:08 IST

चिनी हॅकर्सने अमेरिकेवर सायबर हल्ला चढवून अनेक प्रकारची गोपनीय माहिती हातोहात लांबवली

चीनला सगळ्या जगावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि जगात एकच सर्वात शक्तिशाली देश म्हणजे स्वत:लाच सुपरपॉवर बनवायचं आहे, हे कधीच लपून राहिलेलं नाही. त्यामुळे त्यासाठी जे जे काही करता येईल ते ते सारं चीन करीत असतो. स्वत:ला सुपरपॉवर बनवण्याच्या हव्यासापोटी दुसऱ्याला नामोहरम करणं, त्यांना कोंडीत पकडणं, त्याचा दुरुपयोग करून त्यांना आपल्या ‘ताब्यात’ ठेवण्याचा प्रयत्न करणं.. यातही चीननं कधीच कसूर केलेली नाही. त्यामुळेच जमीन, पाणी आणि आकाश या सर्व ठिकाणी आपलाच कब्जा असावा यासाठी चीनचा प्रयत्न असतो.

भारतासह अनेक शेजारी देशांची जमीन चीननं हडेलहप्पी करून आधीच बळकावली आहे. समुद्राच्याही अनेक भागांवर ‘आमचाच’ म्हणून त्यांनी हक्क गाजवायला सुरुवात केली आहे. आता तर अंतराळातही त्यांनी ‘आपले झेंडे’ गाडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अंतराळातल्या अनेक भागांवर आधीच पोहोचायचं आणि हा भागही आमचाच म्हणून त्यावर अतिक्रमण करायचं असा फंडा चीन कधीपासून अवलंबतो आहे. अवकाशात त्यांनी आपले गुप्तहेर उपग्रह सोडलेले आहेत. त्यातून सर्व प्रकारची संवेदनशील माहिती ते मिळवत असतात. चिनी हॅकर्स तर अख्ख्या जगात पोहोचलेले आणि पसरलेले आहेत. जिथून कुठून, जी कोणतीही माहिती त्यांना मिळेल, ती मिळवण्याचा आणि त्या माध्यमातून ब्लॅकमेल करायचा सपाटा त्यांनी लावला आहे.

मोबाइलवरील चिनी ॲप्स हा उद्योग कधीचाच करीत आहेत. त्यामुळे भारतासह जगभरातील अनेक देशांनी चीनच्या बऱ्याच ॲप्सवर बंदी घातली आहे. जगातल्या सर्वच देशांच्या, विशेषत: जे देश भविष्यात आपल्याला त्रासदायक ठरू शकतील, असं त्यांना वाटतं, त्या भागांवर तर चिनी हॅकर्सची अत्यंत बारकाईनं नजर असते. भारत आणि अमेरिकेवर त्यांचा विशेष डोळा आहे. मध्यंतरी चिनी हॅकर्सनी अमेरिकेचा बराच संवेदनशील डेटा हॅक केला होता. अमेरिकेची संरक्षण व्यवस्था, त्यांची शस्त्रास्त्रांची कोठारं, अमेरिकन संसद.. असा सारा तपशील त्यांनी गोळा केल्यानं अमेरिकेच्या पोटात गोळा आला होता. 

त्यानंतर अमेरिकेनं आपली संरक्षण व्यवस्था अतिशय कडक केली होती. पण त्यानंतरही चिनी हॅकर्सनं अमेरिकेवर पुन्हा सायबर हल्ला चढवून अनेक प्रकारची गोपनीय माहिती हातोहात लांबवली आहे. अनेक दिवस अमेरिकेलाही त्याचा पत्ता नव्हता. चिनी हॅकर्सनं अनेक सरकारी कार्यालयांचा डाटा तर चोरलाच, पण त्यांनी अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेटवरही (कोषागार कार्यालय) सायबर हल्ला चढवला आणि अत्यंत गोपनीय तसंच वित्तीयदृष्ट्या अति संवेदनशील माहिती स्वत:च्या कब्जात घेतली आहे. हॅकर्सनी अमेरिकेच्या अनेक वर्क स्टेशन्सचा ‘रिमोट ॲक्सेस’ घेतला आणि त्यातील माहिती लांबवली. चिनी हॅकर्सच्या या हल्ल्यानंतर अमेरिका अक्षरश: हादरलं आहे. चिनी हॅकर्सनी किती वर्कस्टेशन्सचा ताबा घेतला आणि कोणती, किती कागदपत्रे, तपशील मिळवला याची माहिती अमेरिकन अधिकारी आता घेत आहेत. 

अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, ट्रेझरी डिपार्टमेंटची अतिशय संवेदनशील माहिती आता चीनच्या हाती लागली आहे. चिनी हॅकर्सची ही घुसखोरी सुरू झाली डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला. खुद्द ट्रेझरी डिपार्टमेंटनंच आता त्याची माहिती दिली आहे. खात्याच्या अधिकाऱ्यांनी नुकतंच एक पत्र लिहून सरकारला आणि खासदारांना ही माहिती कळवली आहे. त्यांच्या मते, ही अतिशय धक्कादायक घटना आहे. ‘एफबीआय’ आणि इतर संस्था मिळून या घटनेची आता बारकाईनं माहिती घेऊन चौकशी करीत आहेत. हॅकर्सनी नेमकी कोणती माहिती चोरली आणि या माहितीचोरीचा काय दुष्परिणाम होऊ शकतो, याचाही अंदाज ते घेत आहेत. 

अमेरिकेच्या ट्रझरी सेक्रेटरीचं म्हणणं आहे, चोरी झाली हे तर खरं आहे, त्यामुळे आम्ही लगेच आमची सगळी सर्व्हिस ऑफलाइन केली आहे. हॅकर्सकडे आता आमच्या ट्रेझरीचा ॲक्सेस नाहीये. कोषागार कार्यालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं, गेल्या चार वर्षांत आम्ही आमची ऑनलाइन सुरक्षा खूपच मोठ्या प्रमाणावर बळकट केली आहे. पण सायबर चोर आणि सायबर पोलिस दोघंही एकमेकांवर वरचढ राहण्याचा प्रयत्न सतत करत असतात. आता आम्हाला आणखी काळजी घ्यावी लागणार आहे. 

टेलिकॉम कंपन्यांतही घुसखोरी!

चिनी हॅकर्सनी अमेरिकेच्या प्रमुख टेलिकम्युनिकेशन्स कंपन्यांंमध्येही मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे. तब्बल नऊ कंपन्यांचा डेटा त्यांनी चोरला आहे. हॅकर्सनी लोकांच्या खासगी संभाषणासह अधिकारी आणि प्रमुख व्यक्तींचं संभाषणही हॅक केलं आहे. ही सगळी माहिती चीन सरकारपर्यंत पोहोचली आहे. या संवादामध्ये काय काय होतं, कोणती संवेदनशील माहिती आणि चीन याचा कसा दुरुपयोग करेल, याची आता अमेरिकेला चिंता लागून राहिली आहे.

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीUSअमेरिकाcyber crimeसायबर क्राइमchinaचीन