जगभर : फॅशनेबल ‘फाटकी’ जिन्स घालाल तर फाशी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 09:39 AM2021-06-11T09:39:04+5:302021-06-11T09:39:31+5:30

Kim Jong-un : उत्तर कोरिया हादेखील अत्यंत बंदिस्त देश आहे. जगापर्यंत आपल्या बातम्या पोहोचू नयेत, याबाबत उत्तर कोरिया नेहेमीच दक्ष असतो. याबाबतीत ते चीनच्याही दोन पावलं पुढेच आहेत.

Around the world: If you wear fashionable 'ripped' jeans, you will be hanged! | जगभर : फॅशनेबल ‘फाटकी’ जिन्स घालाल तर फाशी!

जगभर : फॅशनेबल ‘फाटकी’ जिन्स घालाल तर फाशी!

Next

उत्तर कोरिया हा देश आणि तेथील हुकूमशहा किम जोंग उन हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणानं चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी खुद्द किम जोंग उन हेच गायब झाले होते आणि त्यांच्या मृत्यूच्या अफवा जगभरात पसरल्या होत्या. शेवटी त्यांनी स्वत:च लोकांना दर्शन दिले, त्या वेळी ते ‘जिवंत’ असल्याचे कळले. त्यांची पत्नी रि सोल-जू हीदेखील वर्षभर कोणालाच दिसली नव्हती. ती स्वत:हून समोर आली (किंवा तिला दाखवलं गेलं) त्याचवेळी ती ‘आहे’ हे जगाला कळलं.

उत्तर कोरिया हादेखील अत्यंत बंदिस्त देश आहे. जगापर्यंत आपल्या बातम्या पोहोचू नयेत, याबाबत उत्तर कोरिया नेहेमीच दक्ष असतो. याबाबतीत ते चीनच्याही दोन पावलं पुढेच आहेत. तिथले अनेक कायदे तर अगदी विचित्र आणि अमानवी म्हणावेत असे आहेत. तिथे नुकत्याच झालेल्या नव्या कायद्यांनी उत्तर कोरिया पुन्हा जगात चर्चेत आले आहे. देशात नागरिकांनी विदेशी कपडे घातले, विदेशी चित्रपट पाहिले, फॅशनेबल समजली जाणारी, पण उघडं अंग दाखवणारी ‘फाटकी’ जिन्स घातली, असंसदीय शब्द वापरले, शिव्या दिल्या तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. इतकी की  फाशीची शिक्षाही होऊ शकते! चंगळवादी आणि भोगवादी संस्कृतीचा शिरकाव आपल्या देशात होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जात आहे, असं किम जोंग उन यांचं म्हणणं आहे. 

यासंदर्भात सरकारी मीडियाला त्यांनी नुकताच एक ‘खलिता’ही पाठवला आहे. आपल्याला देशात कोणती ‘संस्कृती’ हवी आहे, याचा सविस्तर उल्लेख त्यांनी त्यात केला आहे. उत्तर कोरियात अनेक कायदे अतिशय कठोर आहेत. त्यात रोज नव्याने भरच पडत आहे. नव्या कायद्यानुसार आता एखाद्या कर्मचाऱ्याने गुन्हा केला, तर त्या कंपनीच्या मालकालाही सजा होईल, मुलांनी गुन्हा केला, तर पालकही तुरुंगाची हवा खातील! 

इथले एकेक कायदे नुसते ऐकले तरी अंगावर काटा उभा राहतो. उत्तर कोरियाच्या कायद्यांनुसार तिथले नागरिक फक्त ‘मान्यताप्राप्त’ असलेले १५ प्रकारचे हेअरकट करू शकतात. ब्लू जिन्स घालायची त्यांना परवानगी नाही आणि ‘उघडं अंग दाखवणारी’ फाटकी जिन्स तर नाहीच नाही. इंटरनेट, वेबसाइट‌्स, वायफायला येथे परवानगी नाही. परदेशी नागरिक इथलं स्थानिक चलन वापरू शकत नाहीत. बाहेरच्या देशातली कोणतीही व्यक्ती उत्तर कोरियात मालमत्ता खरेदी करू शकत नाही. अति श्रीमंत असतील, तेच लोक इथे कार खरेदी करू शकतात. कारण, गाड्यांच्या किमतीच चाळीस हजार डॉलर्सच्या पुढे (सुमारे तीस लाख रुपये) आहेत.

इतकंच काय, सायकल खरेदी करणंही कोरियात अतिशय महागडं आहे. गाड्यांना जशा नंबर प्लेट‌्स असतात, तशा सायकलींनाही येथे लायसेन्स प्लेट‌्स आहेत. काही वर्षांपूर्वीचं जुनं वृत्तपत्र  विकतच काय, अगदी लायब्ररीतही मिळू शकत नाही. रस्त्यावर किंवा सबवे स्टेशन्सवर जिथे वृत्तपत्रांसाठी स्पेशल स्टॅण्ड‌्स आहेत, तिथे मात्र  मोफत वर्तमानपत्र वाचता येऊ शकेल. धार्मिक पुस्तकांची खरेदी या देशात करता येत नाही.  लोकल सिम कार्डवरून नागरिक परदेशात फोन लावू शकत नाहीत. तिथले नागरिक घरी गरम पाण्याने शॉवर घेऊ शकत नाहीत. गरम पाण्यासाठीची कोणतीही केंद्रीय व्यवस्थाच तेथे नाही, त्यामुळे शॉवर्सही नाहीत. रूम हिटर्स नाहीत. घर उबदार ठेवायचं असेल, तर त्यासाठी लाकडाचा वापर करता येणारी भट्टी येथे वापरली जाते.

कोणत्याही दुकानात  कोका-कोलासारखी शीतपेयं मिळू शकत नाहीत. तिथले नागरिक सहजपणे परदेशात  जाऊ शकत नाहीत, कारण आंतरराष्ट्रीय प्रवासावर खूप बंधनं आहेत. अगदी देशातल्या देशात कुणाला नातेवाइकांकडे दुसऱ्या शहरात जायचं असेल, तरी त्यासाठी परवानगी घ्यावी लागते. मॅकडोनल्ड‌्ससारख्या खाद्यपदार्थांच्या विदेशी दुकानांच्या साखळ्या या देशात दिसणार नाहीत. आधी परवानगी घेतल्याशिवाय परदेशी व्यक्तींना स्थानिक नागरिकांशी बोलता येत नाही किंवा फोटोही काढता येत नाहीत. गर्भनिरोधनाची साधनं विकत मिळणं इथे जवळपास अशक्य आहे. कारण ती विकायला दुकानांना परवानगीच नाही. तिथे जी काही माध्यमं आहेत, त्यावर केवळ सरकारचेच गुणगान पाहता, वाचता, ऐकता येतं, कारण त्या सर्वांवर सरकारचं नियंत्रण आहे. स्त्री किंवा पुरुषांच्या कुठल्याही सलूनमध्ये  गेलात, तर तिथे भिंतीवर चार्टच लावलेला  दिसेल. त्यातलाच एखादा हेअरकट प्रत्येकाला निवडावा लागतो. किम जोंग उन यांचा हेअरकट तिथे त्यातल्या त्यात ‘स्टायलीश’ मानला जातो, त्यामुळे बहुसंख्य पुरुष त्यांच्यासारखाच हेअरकट करतात!

सार्वजनिक मृत्युदंड! 
उत्तर कोरियातून बाहेर पडण्यात यशस्वी झालेली यून मी सो सांगते, मी अकरा वर्षांची होते, तेव्हा पहिल्यांदा एका व्यक्तीला जाहीरपणे मृत्युदंड देताना पाहिलं. कारण काय, तर दक्षिण कोरियामधील एका चित्रपटाचा व्हिडिओ त्याच्याकडे सापडला होता. त्याला सार्वजनिक ठिकाणी मध्यभागी एका खांबाला बांधण्यात आलं आणि त्याच्यावर गोळी झाडली गेली. ही शिक्षा पाहण्यासाठी लोकांना जाहीर निमंत्रण दिलं गेलं होतं.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Around the world: If you wear fashionable 'ripped' jeans, you will be hanged!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app