"राजीनामा द्या तरच हेलिकॉप्टर पाठवतो"; केपी ओली यांच्यासमोर लष्करप्रमुखांनी घातली होती अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 18:44 IST2025-09-18T18:44:45+5:302025-09-18T18:44:53+5:30

आंदोलकांच्या घेरावातून बाहेर काढण्यासाठी मदत मागणाऱ्या केपी ओली यांच्यासमोर लष्कर प्रमुखांनी अट ठेवली होती

Army chief had set a condition before KP Oli who asked for help to get out of the protesters siege | "राजीनामा द्या तरच हेलिकॉप्टर पाठवतो"; केपी ओली यांच्यासमोर लष्करप्रमुखांनी घातली होती अट

"राजीनामा द्या तरच हेलिकॉप्टर पाठवतो"; केपी ओली यांच्यासमोर लष्करप्रमुखांनी घातली होती अट

Nepal Protests:नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी तरुणाईच्या आंदोलनामुळे तत्कालीन पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला. काठमांडूच्या रस्त्यांवर त्यांच्याविरुद्ध संतापाची लाट उसळली आणि संतप्त आंदोलकांनी त्यांच्या निवासस्थानाला घेराव घातला होता. आंदोलनामुळे आधीच निराश झालेले ओली प्रचंड घाबरले आणि पळ काढण्याचा निर्णय घेतला. घराबाहेर गर्दी असल्याने माजी पंतप्रधान ओली यांनी नेपाळच्या लष्करप्रमुखांना फोन करून हेलिकॉप्टर देण्याची विनंती केली. मात्र लष्करप्रमुख अशोक राज सिग्देल यांनी एक अट ठेवली आणि त्यानंतर ओली यांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवलं.

नेपाळी न्यूज पोर्टल उकेराच्या वृत्तानुसार, लष्करप्रमुखांनी माजी नेपाळी पंतप्रधान ओली यांच्यासमोर, तुम्ही राजीनामा दिल्यानंतरच हेलिकॉप्टर मिळेल अशी अट ठेवली होती. शेर बहादूर देउबा सरकार कोसळल्यानंतर २०२४ मध्ये सत्तेत परतलेल्या ओली यांना भ्रष्टाचार, घराणेशाही, संसाधनांचे गैरव्यवस्थापन आणि हुकूमशाहीच्या आरोपांमुळे टीका आणि जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला.  ८ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या जनरेशन झेड आंदोलकांच्या आंदोलनाने केपी शर्मा ओली यांना लक्ष्य करण्यात आलं.

२० आंदोलकांच्या मृत्यूनंतर ९ सप्टेंबर रोजी हिंसक जमावाने सरकारी इमारती आणि राजकारण्यांच्या घरांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. तेव्हा घाबरलेल्या केपी ओली यांनी लष्करप्रमुख सिग्देल यांना फोन करून हेलिकॉप्टर पाठवण्याची विनंती केली. पण त्यांच्यापुढे अट ठेवण्यात आली.
जेव्हा सोशल मीडिया साइट्सवरील सरकारी बंदीच्या विरुद्ध आंदोलक रस्त्यावर उतरले त्यावेळी आंदोलन चिघळलं होतं. त्यामुळे लोकांमध्ये आणखी तीव्र संताप निर्माण झाला. यानंतर काठमांडूसह संपूर्ण नेपाळमध्ये कर्फ्यू लावण्यात आला. 

सुरक्षा दलांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबारामुळे संतप्त झालेल्या जमावाने प्रमुख नेत्यांच्या घरांना लक्ष्य केले. दुपारपर्यंत, सर्वपक्षीय बैठकीची तयारी सुरू असताना प्रचंड यांच्या निवासस्थानी हल्ला करण्यात आला. ओली यांनी दावा केला की सरकार सर्व भागधारकांशी चर्चा करत आहे, मात्र मंत्र्यांच्या निवासस्थानांवर आणि पोलीस ठाण्यांवरील हल्ल्यांमुळे सुरक्षा दलांवर दबाव आला. त्यानंतर ओली यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक बोलावली आणि हिंसक प्रयत्न आणि अतिरेकी बळामुळे झालेल्या मृत्यूंची तक्रार केली. गुप्तचर यंत्रणेतील अपयशामुळे संकट आणखी वाढले.

आंदोलकांनी देउबा यांच्या घरावर हल्ला केल्यानंतर धक्का बसलेल्या ओली यांनी नेपाळ लष्कर प्रमुख सिग्देल यांना सैन्य पाठवून तेथून बाहेर पडण्यास सांगितले. लष्कर प्रमुखांनी त्यांच्या राजीनाम्याची अट पुढे ठेवली. आंदोलकांनी संसद, सिंहदरबार आणि नेत्यांच्या घरांना आग लावल्यानंतर, ओली यांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करावा लागला. ओली यांचा राजीनामा राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्याकडे पाठवण्यात आला. उपपंतप्रधान बिष्णू पौडेल यांच्यासारखे ओली यांचे सहकारीही मागे राहिले, कारण त्यांनी हेलिकॉप्टरमध्ये जागा नव्हती.
 

Web Title: Army chief had set a condition before KP Oli who asked for help to get out of the protesters siege

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nepalनेपाळ