आंदोलकांनी महिला मंत्र्यांनाही सोडलं नाही; आरजु राणांवर लाथा-बुक्क्यांचा वर्षाव, घराचंही नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 11:11 IST2025-09-10T11:05:59+5:302025-09-10T11:11:36+5:30

नेपाळमध्ये सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी परराष्ट्र मंत्र्यांना बेदमा मारहाण केली.

Angry protesters rained punches and kicks on Nepal Foreign Minister Arzu Rana Deuba | आंदोलकांनी महिला मंत्र्यांनाही सोडलं नाही; आरजु राणांवर लाथा-बुक्क्यांचा वर्षाव, घराचंही नुकसान

आंदोलकांनी महिला मंत्र्यांनाही सोडलं नाही; आरजु राणांवर लाथा-बुक्क्यांचा वर्षाव, घराचंही नुकसान

Nepal Protest: हिंसक आंदोलनामुळे नेपाळमधील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. आंदोलकांनी संसद, पंतप्रधान, राष्ट्रपतींचे वैयक्तिक निवासस्थान पेटवून दिले आहेत. तसेच सुरक्षा दलांकडून शस्त्रे हिसकावून घेतली. आंदोलकांनी तीन माजी पंतप्रधानांच्या घरांवरही हल्ला केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा, अर्थमंत्री विष्णू पौडेल आणि इतर अनेक मंत्र्यांना त्यांच्या घरात घुसून मारहाण केली. या आंदोलनातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे आंदोलकांनी नेपाळच्या परराष्ट्र मंत्री आरजू राणा देऊबा यांच्यावरही हल्ला केला. आरजू राणा या माजी पंतप्रधान देऊबा यांच्या पत्नी आहेत. आरजू यांना मारहाण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोमवारी नेपाळमध्ये तरुणांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले आंदोलन मंगळवारी आणखी हिंसक झाले. भ्रष्टाचार, घराणेशाही आणि सोशल मीडियावरील बंदीविरोधात आंदोलन तीव्र झालं आहे. राजधानी काठमांडू आणि इतर शहरांमध्ये जाळपोळ आणि तोडफोड सुरु असून अनेक मंत्र्यांना लक्ष्य करण्यात आलं. आंदोलनकर्त्यांनी देशाचे माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा आणि त्यांच्या पत्नी, परराष्ट्र मंत्री आरजू राणा देऊबा यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. सध्या आरजू कुठे आहे हे कोणालाही माहिती नाही. देऊबा आणि आरजू यांना मारहाण झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मात्र आंदोलकर्ते आरजू यांना कुठे घेऊन घेऊन गेले याबाबत माहिती समोर आलेली नाही.

मंगळवारी काठमांडूतील बुडानिलकांठामध्ये आंदोलकांनी देऊबा यांच्या घराची तोडफोड केली. व्हिडिओमध्ये हल्ल्यानंतर माजी पंतप्रधानांच्या चेहऱ्यावरून रक्त येत असल्याचे दिसून येत होतं. देऊबा आणि आरजू यांना वाचवण्यासाठी अधिकारी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या निवासस्थानाची तोडफोड करण्यात आली. आंदोलकांनी आरजू राणा यांनाही बेदम मारहाण केली. व्हिडिओमध्ये आंदोलक आरजू यांना लाथा मारताना दिसत आहेत.

आंदोलकांनी काही काळ या जोडप्याला ओलीस ठेवले होते. देऊबा यांच्या निवासस्थानाची तोडफोड करण्यात आली आणि वैयक्तिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले. त्यानंतर सैन्याने देऊबा यांना वाचवले. मात्र आरजू कुठे आहे हे अद्याप कळलेले नाही. आंदोलक त्यांना  त्यांच्यासोबत घेऊन गेल्याचे म्हटलं जात आहे.

आंदोलनाचा भाग म्हणून आणखी एक माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांचे घरही जाळण्यात आले. या घटनेत त्यांच्या पत्नी राज्यलक्ष्मी चित्रकर यांचीही हत्या करण्यात आली. निवासस्थानाला लावलेल्या आगीत त्या गंभीरपणे भाजल्या आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतरही नेपाळच्या अनेक भागात हिंसाचार सुरूच आहे.

Web Title: Angry protesters rained punches and kicks on Nepal Foreign Minister Arzu Rana Deuba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nepalनेपाळ